मुंबई, 13 फेब्रुवारी : बनावट नोटीशीचा (Forged notice) आधार घेऊन नवऱ्याची बँक स्टेटमेंट्स (Bank statements) मिळवणं मुंबईच्या महिलेला चांगलचं महाग पडलं आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामीन (anticipatory bail) फेटाळला असून तिची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे. या महिलेची घटस्फोटाची केस सध्या कोर्टात सुरू आहे. या खटल्याच्या दरम्यान पोटगी मिळवण्यासाठी अवैध पद्धतीनं नवऱ्याचं बँक स्टेटमेंट्स मिळवल्याचा तिच्यावर आरोप आहे. काय आहे प्रकरण? या प्रकरणातील आरोपी महिला मुंबईतील खारची रहिवाशी आहे. तिची 2012 पासून नवऱ्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) केस सुरू आहे. यापूर्वी कौटुंबिक न्यायालयानं (Family Court) तिच्या मुलांना देखभालीचा खर्च देण्याचा निर्णय दिला. मात्र तिचा खर्च देण्याची मागणी फेटाळली होती. या निर्णयाला आरोपी महिलेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उच्च न्यायालयात आपली बाजू मांडत असताना या महिलेनं तिच्या नवऱ्याचं, त्याच्या पालकांचं आणि कंपनीचं बँक स्टेटमेंट्स सादर केलं. ( वाचा : नवविवाहितेवर बलात्कार करणाऱ्या सासऱ्यासह पती, दीराचे फास आवळले; आता सुटका नाही, हायकोर्टाचा निवाडा ) आरोपी महिलेनं हे स्टेमेंट्स सादर करताच नवऱ्यानं यावर आक्षेप घेत तिनं हे स्टेटमेंट कसं मिळवलं याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर आरोपी महिलेनं स्थानिक पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीनं बँकेला नोटीस पाठवल्याचं उघड झालं. आरोपी महिलेच्या पतीने त्यानंतर माहिती अधिकाराचा वापर करुन ही पोलीस स्टेशनमधून ही नोटीस मिळवली. त्यावेळी ही नोटीस खोट्या कागदपत्राच्या आधारावर दिली गेल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीवर फसवणूक आणि खोटी कागदपत्रं सादर करण्याचा गुन्हा दाखल केला. या महिलेनं खोटी कागदपत्रं सादर करण्यासाठी कुणाची मदत घेतली याची चौकशी करण्यासाठी तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.