भिवंडीतील गांजा रॅकेटचा पर्दाफाश; मुंबईच्या गुन्हे शाखा विभागाची धडक कारवाई

हे रॅकेट पाच ते सहा वर्ष जुनं असून तिथल्या प्रमुख आरोपीच्या मदतीने हे चालवत असल्याचा खुलासा चौकशीतून समोर आला आहे.

हे रॅकेट पाच ते सहा वर्ष जुनं असून तिथल्या प्रमुख आरोपीच्या मदतीने हे चालवत असल्याचा खुलासा चौकशीतून समोर आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 फेब्रुवारी: मुंबईच्या गुन्हे शाखा विभागाने आणि आमली पदार्थ विरोधी कक्षाने शुक्रवारी ( 12 फेब्रुवारी)  विक्रोळीतील मुंबई ठाणे हायवेवर सापळा रचून एक टेम्पो पकडला. या टेम्पोमधून जवळपास अठराशे किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांज्याची किंमत साधारण साडेतीन कोटी सांगण्यात येत आहे. हे गांज्याचं रॅकेट चालवणाऱ्या आकाश यादव, दिनेशकुमार सरोज या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर मुख्य आरोपी संदिप सातपुते हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

  आरोपी हा गांजा ओडिसामधून आणून भिवंडीतल्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवत होते. तिथून हा गांजा मुंबई, पालघर, ठाणे, नवीमुंबई, सुरत, मिरारोड, वसई अशा अनेक भागांत पुरवला जायचा. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून दरवेळी वेगळा टेम्पो आणि वेगवेगळे ड्रायव्हर हा गांजा साठा आणायचे. ओडिसातील कंधमाळ या नक्षली भागात गांजाची शेती केली जाते. तेथून हा गांजा गंजम येथे पोहचवला जायचा आणि नंतर टेम्पोत नारळ शहाळे भरून त्यासोबत गांजा भरून पाठवला जायचा. वाटेत सोलापूर आणि पुण्यात हा गांजा वितरीत केला जात होता. (हे देखील वाचा - बलात्कार पीडितेच्या हातावारील टॅटू पाहताच उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ निर्णय!)

  या सर्व रॅकेटचा म्होरक्या आणि गोडाऊनचा मालक संदिप सातपुते हा ठाण्याचा रहिवासी असून तो सध्या फरार आहे. मागील पाच ते सहा वर्षापासून संदिप हे रॅकेट ओडिसातील प्रमुख आरोपी लक्ष्मीप्रधानच्या मदतीने चालवत होता. दर महिन्याला ते ओडिसातून राज्यात 5 टन गांजा, तर केवळ मुंबईत 4 टन गांजा घेऊन येत होते. सर्व व्यवहार हे हवाला पध्दतीने किंवा रोख रक्कम देऊन किंवा बँक खात्यात पैसे जमा करून केले जात होते. मागील चार महिन्यात मुंबईत अशा प्रकारच्या 32 कारवाई झाल्या असून त्यामध्ये 15 कोटीपेक्षा जास्त किमतीचा विविध अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यासाठीच मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
  Published by:Aditya Thube
  First published: