नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून दिसून येतो आहे. मध्य प्रदेशमधल्या भिंड पोलिसांनी (MP Police bust online Ganja racket) काही दिवसांपूर्वी अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश केला होता. आता याच कनेक्शनमध्ये आंध्र प्रदेशातूनही पाच जणांना अटक (Five arrested from Vizag) करण्यात आली आहे. यामध्ये एका बापलेकाचाही समावेश असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये अमली पदार्थांचं एक मोठं प्रकरण (MP online Ganja selling racket) समोर आलं होतं. यात मध्य प्रदेशात कढीपत्त्याच्या नावाखाली चक्क गांजाची विक्री सुरू असल्याचं उघड झालं होतं. हा ‘कढीपत्ता’ एका ई-कॉमर्स साइटच्या माध्यमातून मागवला जात होता. या प्रकरणी मध्य प्रदेशातून तीन तरुणांना अटक (MP Ganja racket) करण्यात आली होती. यानंतर आता विशाखापट्टणममधून पाच जणांना अटक (Ganja racket five arrested) करण्यात आली आहे.
अटक केलेल्यांमध्ये सीएच श्रीनिवास राव, त्याचा मुलगा मोहन राजू उर्फ राखी, जे. कुमारस्वामी, बी. कृष्णन राजू आणि सीएच व्यंकटेश्वर राव यांचा समावेश आहे. हे सर्व विशाखापट्टणमचे रहिवासी आहेत. यातल्या श्रीनिवास रावकडून 48 किलो ड्राय गांजा जप्त (Dry Ganja seized) करण्यात आल्याची माहिती विशाखापट्टणमच्या स्पेशल इन्फोर्समेंट ब्युरोचे जॉइंट डायरेक्टर एस. सतीश कुमार (Sathish Kumar) यांनी दिली.
21 नोव्हेंबरला ही कारवाई करण्यात आली होती. श्रीनिवाससोबत त्याचे दोन साथीदार कुमारस्वामी आणि कृष्णन राजू यांनाही अटक करण्यात आली. तसंच, व्यंकटेश्वर राव या ड्रायव्हरलाही अटक करण्यात आली आहे. कुमारस्वामीचा मुलगा मोहन राजूही या तस्करीत सहभागी होता असं दिसून आल्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली, असं सतीश कुमार यांनी स्पष्ट केलं.
या वेळी गांजासोबतच कव्हर, बॉक्स, चिकटपट्टी आणि वजनकाटा असं पॅकिंगचं सामानही जप्त करण्यात आलं होतं. यानंतर केलेल्या तपासात मध्य प्रदेशातले त्यांचे आणखी दोन साथीदार समोर आले. सूरज पावैया आणि मुकुल जयस्वाल यांनी एका ई-कॉमर्स साइटवर विक्रेते म्हणून नावनोंदणी केली होती. या दोघांना ‘सुपरनॅचरल स्टीव्हिया ड्राय लीव्ह्ज’च्या (Supernatural stevia dry leaves) नावाने श्रीनिवासच गांजा पुरवत होता.
गेल्या आठ महिन्यांमध्ये 700 किलो गांजाची तस्करी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावैया आणि जयस्वाल यांनी दुसऱ्या कंपन्यांचे जीएसटी नंबर वापरून ‘बाबू टेक्स’ नावाची कंपनी रजिस्टर केली होती. याच कंपनीच्या माध्यमातून ते विशाखापट्टणमधून मागवलेला गांजा मध्य प्रदेशमध्ये पसरवत होते. गेल्या आठ महिन्यांमध्ये सुमारे 600 ते 700 किलो गांजा विशाखापट्टणमहून मध्य प्रदेशात आणला गेला असावा, असा संशय सतीश कुमार यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smuggling