इंदूर, 28 एप्रिल: मध्यप्रदेशातील एका हत्याकांडाने वेगळं वळण घेतलं आहे. पोलिसांनी पूजा हत्याकांड (Puja Murder Case MP) प्रकरणाचा खुलासा केला आहे, गर्भवती पूजाचे खुनी अन्य कोणी नसून तिचा पोलीस अधिकारी असलेला पती आणि दीर हे दोघे निघाले आहेत. पूजाचा पती 34 बटालियनचा कमांडर आहे. तर, तिचा दीर पोलीस कर्मचारी असून तो छिंदवाडा येथे तैनातीला आहे. या महिलेच्या पतीने आपल्या दोन लहान भावांसह मिळून तिची हत्या केली. तो स्वतःला निरपराध असल्याचे सुरुवातीला सांगत होता. मात्र नंतर सर्व प्रकरण उघडकीस आले.
या हत्येने इंदूरच्या मल्हारगंज पोलीस ठाणे परिसरात खळबळ उडाली आहे. येथील कमला नेहरू कॉलनीतील रामदुलारी अपार्टमेंटमध्ये गेल्या शनिवारी पूजाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सुरुवातीला पूजाच्या एका दीराचे नाव समोर आले होते तर पूजाचा पती आपण स्वतः निरपराध असल्याचे सांगत होता. पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला आरोपी पोलीस अधिकाऱ्याची दुसरी पत्नी होती, याच बाबीवरून त्यांच्यात दररोज वाद होत असत.
कोरोना काळात पोलीस विभागाला हादरा देणाऱ्या या हत्याकांडाची चौकशी सुरू होती. एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणाप्रमाणेच याचा तपास करत पोलिसांनी सुरुवातीला मृत महिलेच्या दोन्ही दिरांना संशयाच्या आधारावर अटक केली होती. यानंतरही पोलिसांची चौकशी सुरू होती. मृत महिलेच्या दोन्ही दिरांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी तोंड उघडले आणि हे प्रकरण स्पष्ट झाले.
हे वाचा - आईच्या मृतदेहाशेजारी 2 दिवस उपाशी पडून होतं बाळ, वर्दीतील आईपणाला फुटला पाझर
पोलीस अधिकारी जितेंद्र मस्के याची दोन लग्ने झाली आहेत, त्याची पहिली पत्नी अन्नू धार येथे राहते तिला मुलेही आहेत तर जितेंद्र याने दुसरे लग्न इंदूरच्या पूजा उर्फ जान्हवीशी केले होते. पूजाला जेव्हा ही बाब माहिती झाली की, जितेंद्र आधीपासूनच विवाहित आहे, तेव्हा तिने त्याची पहिली पत्नी अन्नू हिला थेट फोन केला. त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. यानंतर पहिली पत्नी अन्नू हिने जितेंद्रला मुलांसह आत्महत्या करण्याची धमकी दिली. यामुळे जितेंद्र ताबडतोब धारला पोहोचला. येथे जितेंद्रचा भाऊ राहुल आधीपासून हजर होत, याशिवाय त्याच्या मावशीचा मुलगा नवीन हाही तेथे होता या तिघांनी मिळून पूजाला ठार करण्याचा कट रचला.
हे वाचा - आर्थिक कुचंबणा! ज्या झाडाखाली असायची त्याची नाश्त्याची हातगाडी,तिथेच घेतला गळफास
यानंतर दोन्ही दीर राहुल आणि नवीन इंदूरला पोहोचले आणि त्यांनी गेल्या शनिवारी आठ महिन्यांची गर्भवती पूजा उर्फ जान्हवी हीची गळा दाबून हत्या केली. पूजाच्या हत्येनंतर तिच्या नातेवाईकांनी पती जितेंद्र याच्यावर गंभीर आरोप लावले. पोलिसांनी राहुल आणि नवीन यांना अटक केली, मात्र जितेंद्रने याबद्दल काहीच माहीत नसल्याचे सांगितले मात्र पोलिसांच्या चौकशीत राहुल आणि नवीन यांनी त्याचे भांडे फोडले आता पोलिसांनी जितेंद्र याला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Indore News, Madhya pradesh