नंदुरबार, 29 ऑगस्ट : राज्यातील गुन्हेगारी वाढल्याचे दिसत आहे. राज्यात अत्याचार, बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीची विक्री करत तिचे लग्न लावल्याचा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीची विक्री करण्यात आली आणि यानंतर तिचे लग्न लावून दिले. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर या अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सोलापूर जिल्ह्यातील चार व धडगाव तालुक्यातील दोन अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 लाख 60 हजारात विक्री -
धडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला संदीप सुकलाल पावरा, संगिता संदीप पावरा यांनी पाहुणी म्हणून घरी घेऊन जातो, असे सांगत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे घेऊन गेले. याठिकाणी गेल्यावर सुप्रिया महाडिक या महिलेच्या मध्यस्थीने गोविंद नावाच्या व्यक्तिला 3 लाख 60 हजार रुपयांत तिची विक्री केली आणि तिचे लग्न लावून घेतले. इतकेच नव्हे तर यानंतर गोविंद याने मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत तीन ते चार महिने शारीरिक संबंध ठेवले.
हेही वाचा - 'पेट्रोल संपलंय, लिफ्ट द्याल का'? महिलेनं आधी मदत घेतली, मग वृद्धाला ब्लॅकमेल करत केलं धक्कादायक कृत्य
यानंतर ही बाब मुलीच्या वडिलांना माहिती झाल्यावर त्यांनी धडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुप्रिया महाडिक (रा. टेंभुर्णी, ता. माढा), गोविंद नावाचा व्यक्ती, संदीप सुकलाल पावरा, संगिता संदीप पावरा (रा. राडीकलम, ता. धडगाव), गोविंदची आई व वडील (रा. आलेगाव, ता. म्हाडा) यांच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात बलात्कार आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास फौजदार डी. के. महाजन हे करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Maharashtra News