पवन सिंह कुंवर, प्रतिनिधी
हल्द्वानी, 13 मार्च : देशात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या आत्महत्या तसेच विवाहबाह्य संबंधाच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तराखंडमधील हल्दवानीमध्ये एका विधवा महिलेने सीआरपीएफ जवानावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या संदर्भात महिलेने काठगोदाम पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नोंदवलेल्या तक्रारीनुसार, महिलेने म्हटले आहे की, सीआरपीएफ जवान विवाहित असतानाही तिला धोका देत तिच्याशी लग्न केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जवानाने मारहाण करून धमकावले. हा सीआरपीएफ जवान काठगोदाम कॅम्पमध्ये तैनात असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून काठगोदाम पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोआलापार येथील पूर्वीखेडा गावात ही विधवा महिला भाड्याने राहते. तक्रारीत तिने म्हटले की, 2021 मध्ये तिची सीआरपीएफ जवान सुरेंद्र सिंह याच्याशी ओळख झाली. तेव्हा त्याने स्वतःला अविवाहित सांगितले. सुरेंद्रने तिचा विश्वास जिंकला होता. गेल्या वर्षी सुरेंद्रने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांचे लग्न झाले.
शौचालयाला गेली महिला, नराधमाने साधला डाव अन् केलं भयानक कृत्य
पीडितेचा आरोप आहे की, लग्नाच्या काही काळानंतर तिच्या लक्षात आले की, सुरेंद्रचे आधीच लग्न झाले आहे. सीआरपीएफ जवानाचे हे सत्य समोर आल्यानंतर त्याने तिला खूप मारहाण केली. तो तिला रोज मारहाण करायचा. तसेच आरोपी तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत होता. सुरेंद्रच्या या कृत्यामुळे तिचे कुटुंबीय घाबरले आहेत. पोलिसांनी सुरेंद्रवर कारवाई करावी, अशी मागणी करत पीडितेने न्याय मागितला आहे.
गोलापार येथील रहिवासी महिलेच्या तक्रारीवरून सीआरपीएफ जवानाविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी जवानाची चौकशी केली जाईल. आरोपात तथ्य आढळल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे या संदर्भात पोलिसांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Local18, Rape, Uttarakhand