अजमेर, 24 नोव्हेंबर : सुखी संसाराची स्वप्नं बघत मुकेश केसवानी आणि जेनिफरनं प्रेमविवाह केला. त्यानंतर लगेचच त्यांच्यातील प्रेमळ नात्यात पराकोटीचा द्वेष निर्माण झाला. सतत दोघांत भांडण होऊ लागली. लग्नानंतर 26 व्या दिवशीच मुकेशनं चाकूनं भोसकून जेनिफरचा खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावताना हा प्रकार उघड झाला आणि त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश व जेनिफर यांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यांनी लव्ह मॅरेज केलं व अजमेरमध्ये एका कॉलनीत राहण्यासाठी आले. लग्नानंतर दोघांमध्ये सतत खटके उडत होते. ते दोघंही शेजाऱ्यांशीही काहीच बोलत नव्हते. पण त्यांच्या भांडणाचा आवाज बाहेरपर्यंत येत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. एकेदिवशी घरातून मोठमोठ्याने आवाज येत होता; पण काही वेळानंतर तो आवाज बंद झाला. हा प्रकार दररोज घडत असल्याने शेजारच्या नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण काही वेळानंतर मात्र खून झाल्याचं उघड झालं. पोत्यात मृतदेह नेताना उघड झाला प्रकार मुकेश-जेनिफरच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्यात भांडण झालेल्या दिवशी घरातून मोठ्याने आवाज येत होता. पण नंतर तो आवाज बंद झाला. त्यानंतर काही वेळाने मुकेश घराबाहेर गेला व जवळपास 20 मिनिटांनंतर परतला. थोड्या वेळ गेल्यानंतर तो मोठं पोतं घेऊन घराबाहेर निघाला व स्कूटीवर ते पोतं ठेवलं. परंतु घाईमध्ये पोतं खालून फाटलं व त्यातून जेनिफरचा एक हात बाहेर पडला. हा प्रकार पाहताच शेजारील लोकांचा थरकापच उडाला. मुकेश ते पोतं घेऊन पसार झाला. तोपर्यंत शेजाऱ्यांनी सर्व प्रकार पोलिसांना कळवला होता. (घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला पण निर्णय चुकला; प्रेमानेच घेतला 19 वर्षीय तरुणीचा जीव) हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुठल्यातरी कारणावरून पती-पत्नीत प्रचंड वाद झाला. दोघे एकमेकांवर जोरजोरात ओरडत होते. जेनिफरने तिच्या आई-वडिलांना सर्व सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर वाद विकोपाला जाऊन मुकेशने चाकूने भोसकून जेनिफरचा निर्घृण खून केला. जेनिफरच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या आहेत. मुकेशनं अतिशय विकृत पद्धतीने पत्नीची हत्या केल्याचं पोलीस महानिरीक्षक रुपिंदरसिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुकेश हा हुंड्याची मागणी करून जेनिफरचा छळ करत होता, अशी तक्रार जेनिफरच्या भावाने केली आहे. मुकेशच्या आईवडिलांना दोघांचं लग्न मान्य नव्हतं त्यामुळे ते दोघं लग्नानंतर वेगळे राहत असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. (विवाहित प्रेयसी दुर्लक्ष करत असल्याने चढला पारा; पुण्यातील प्रियकराने गाठला क्रूरतेचा कळस) आरोपीने दिली खुनाची कबुली घडलेला प्रकार कळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मुकेश राहत असलेल्या घराला कुलूप होतं व पायऱ्यांवर रक्त सांडलेलं होतं. काही वेळाने मुकेश घरी आला आणि पोलिसांना पाहताच पळून जात होता. परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. मुकेशने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली असून, मृतदेह पुष्कर खोऱ्यात फेकल्याचे सांगितलं. पोलिसांनी मृतदेह शोधून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.