बंगळुरू 15 एप्रिल : कर्नाटकातील बेंगळुरू येथून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. यात एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा आधी वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काही वेळाने चाकूने गळा चिरून तिची हत्या केली. प्रकरण लागेरे भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकराला त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या मुलासोबतही अफेअर असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने खुनाची ही संतापजनक घटना घडवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या असं मृत तरुणीचे नाव असून ती 24 वर्षाची होती. ती पोलीस खात्यात क्लर्क होती. कनकपूर येथील प्रशांत नावाच्या तरुणासोबत तिचे गेल्या 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघंही नात्याने भाऊ-बहीण लागत होते.
त्यांच्या अफेअरबाबत घरच्यांना माहिती नव्हती. दरम्यान, नव्याचं आणखी एका मुलासोबतही अफेअर असल्याचा संशय प्रशांतला आला. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाला. पण तरीही ही शंका प्रशांतच्या मनातून सुटत नव्हती. त्यामुळे त्याने नव्याला मारण्याचा कट रचला. नव्याला तिच्या वाढदिवसालाच मारू, असा विचार प्रशांतने केला. त्यामुळे त्याने नव्याला तिचा वाढदिवस साजरा करायचा आहे, असं सांगून आपल्या घरी बोलावलं. नव्याने होकार दिला आणि त्याच्या घरी गेली. तिथे प्रशांतने संपूर्ण खोली छान सजवली होती. त्याने आधी नव्याकडून वाढदिवसाचा केक कापून घेतला. त्यानंतर स्वयंपाकघरातून चाकू आणून तिचा गळा चिरून खून केला. खून केल्यानंतर तो तिथून पळून गेला. दुसरीकडे, नव्या घरी न पोहोचल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ती हरवल्याची नोंद केली. पोलिसांनी तपास केला असता तिचं शेवटचं लोकेशन प्रशांतच्या घरी सापडलं. पोलीस जेव्हा प्रशांतच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना तिथे नव्याचा मृतदेह आढळला. मृतदेह तात्काळ ताब्यात घेऊन व्हिक्टोरिया रुग्णालयात पाठवण्यात आला. दुसरीकडे, प्रशांतचा शोध घेण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. सध्या याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.