प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई, 17 मे : झारखंड येथील मोस्ट वान्टेड गँगस्टर अमन सुशील श्रीवास्तव उर्फ रोहन विनोद कुमार याला अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथक, नवी मुंबई युनिट आणि झारखंड एटीएस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत या आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. झारखंड राज्यातील एकुण 40 गुन्हयामध्ये या आरोपीचा सहभाग आहे. मोस्ट वान्टेड गँगस्टर अमन सुशील श्रीवास्तव हा आरोपी 2015 पासुन फरारी होता. त्याचे वय 31 वर्षे आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचुन त्याला दहशतवाद विरोधी पथक, नवी मुंबई युनिट आणि झारखंड एटीएस यांनी वाशी रेल्वे स्टेशन, नवी मुंबई परिसरातुन अटक केली.
आरोपी अमन सुशील श्रीवास्तव उर्फ रोहन विनोद कुमार याच्यावर झारखंड राज्यात खंडणी, खून, आर्म एक्ट आणि युएपीए कायद्यान्वये अनेक गुन्हे दाखल आहेत. झारखंड एटीएस मागील 9 वर्षांपासुन त्याचा शोध घेत होती. या कालावधीत आरोपी आपले अस्तित्व लपविण्यासाठी भारत देशातील विविध राज्यामध्ये फिरत होता. अखेर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, त्याच्या चौकशीतून आणखी काही गुन्हे उकल होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीला कोर्टात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. तसेच झारखंड एटीएस त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस अधीक्षक (गुप्तवार्ता), दहशतवाद विरोधी पथक यांच्या मागदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथक, नवी मुंबई युनिटचे अधिकारी, अंमलदार आणि झारखंड एटीएस यांच्या संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या कारवाई करण्यात आली.