नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : राज्यातच नव्हे तर देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड समोर आल्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर निक्की यादव हत्याकांडानंतरही खळबळ उडाली होती. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत आणखी एका महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अमन विहारमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरने तिला पेटवून ठार मारल्याचा आरोप आहे. पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. लिव्ह इन पार्टनरचा ड्रग्जच्या कारणावरून महिलेशी वाद - मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उत्तर पश्चिम दिल्लीतील अमन विहारमध्ये तिच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत राहत होता. ड्रग्जवरून दोघांमध्ये वाद झाला. दोघांमधील वाद इतका वाढला की आरोपीने आपल्या लिव्ह इन पार्टनरला पेटवून ठार मारले. मृत महिला ही उत्तर पश्चिम दिल्लीतील बलबीर विहार येथील रहिवासी आहे. ही महिला एका फुटवेअर फॅक्टरीत काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासात ही महिला पतीला सोडून गेल्या सहा वर्षांपासून आरोपी मोहितसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. महिलेला दोन मुले आहेत. पहिले अपत्य पहिल्या पतीपासून तर दुसरे अपत्य मोहितचे आहे. हेही वाचा - विविध नंबरवरुन महिलांना केला व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्यही केले, अखेर…. 10 फेब्रुवारीच्या रात्री मोहित हा त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. मोहितची लिव्ह-इन पार्टनर येथे पोहोचल्यावर तिने मोहितला ड्रग्ज घेताना पाहिले. यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. प्रकरण इतके वाढले की, आरोपीने त्याच्या लिव्ह इन पार्टनर महिलेला टर्पेन्टाइन ऑइल टाकून पेटवून दिले. घटनेनंतर शेजाऱ्यांच्या मदतीने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिचे म्हणणे नोंदवता आले नाही. यानंतर उपचारादरम्यान सोमवारी महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे अमन विहार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. मोहितला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.