पुणे, 13 फेब्रुवारी : सासू-सुनेचा वाद आपल्याला काही नवीन नाही. बऱ्याचदा सासू सुनेचा छळ करताना पाहायला मिळातात. कधीकधी हे चित्र उलटही असते. असाच एक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. सतत होणारा मानसिक त्रास व घालायला सोन्याचे दागिने देत नसल्याने सुनेने सासुला अद्दल घडवण्यासाठी मोठा गुन्हा घडवून आणला. सासूला मारहाण करण्यास सांगून जबरी चोरीचा बनाव कोंढवा पोलिसांनी उघड केला. याप्रकरणी सुनेला कोंढव्यातून तर तिघांना कर्नाटकातून बेड्या ठोकल्या आहेत. सुन हुमेरा आवेश शेख (30, रा. मिठानगर, कोंढवा), कासीम बुरानसाब नाईकवडी (21), मेहबुबसाब अब्दुलसाब बदरजे (25) आणि अब्दुल दस्तगीर मुल्ला (19, तिघेही रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत सासु बिलकिस मोहम्मद ईसाक शेख (रा. मिठानगर, कोंढवा) यांनी कोढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वाचा - फोनवर बोलल्याने प्रेयसीच्या घरच्यांचा राग अनावर, प्रियकराला घरातून बोलावले आणि.. काय आहे प्रकरण? 2 फेब्रुवारी रोजी रोजी फिर्यादी बिलकीस या त्यांचे पती मोहम्मद, सुन हुमेरा व तिचा सहा वर्षाचा मुलगा यांच्यासह घरात असतान बाकी कुटुंबीय कामानिकमत्त बाहेर गेले होते. यावेळी फिर्यादीचे पती मोहम्मद ईसाक मुलाला शाळेतून आणण्यासाठी बाहेर गेले होते. यादरम्यान, घरात दोन अनोळखी व्यक्ती शिरल्या. त्यांनी बिलकिस यांच्या तोंडाला टॉवेल गुंडाळुन त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व सुनेच्या गळ्यातील गंठण हे जबरदस्तीने चोरी केले होते. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोंढवा पोलीस गुन्ह्याचा तपास करत असताना हुमेरा ही उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
याच दरम्यान तांत्रिक विश्लेषणात पोलीस अमलदार महेश वाघमारे यांना तीन व्यक्ती गुन्हा केल्यानंतर कर्नाटक येथे पळून गेल्याचे आढळले. याप्रकरणी गुन्ह्यात तिघांची नावे निष्पन्न करून तिघांना कर्नाटक येथील गुलबर्गा येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सासु ही हुमेरा हिला त्रास देत असल्याने व तिचे सोन्याचे दागिने हे तिला देत नसल्याने तिने कासीम बुरानसाब नाईकवडी याला घरातून दागिने चोरण्यास सांगितल्याचे तपासात समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, अमंदार अमोर हिरवे, महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, सुहास मोरे, विकास मरगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.