नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : महिला आणि मुलींशी गैरवर्तन होत असल्याच्या घटना सतत आपल्या कानांवर पडत असतात. सार्वजनिक ठिकाणं, कामाच्या कार्यालयांपासून तर अगदी स्वत:च्या घरातदेखील महिला सुरक्षित नसल्याचं या प्रकारांवरून सिद्ध झालं आहे. बेंगळुरूमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. बेंगळुरूमध्ये 25 नोव्हेंबर रोजी केरळमधील एका 23 वर्षांच्या तरुणीवर रॅपिडो चालकासह दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला. शारीरिक त्रास होऊ लागल्यानं पीडित तरुणी क्लिनिकमध्ये गेली तेव्हा ही घटना उघडकीस आली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी (29 नोव्हेंबर) एका महिलेसह तीन जणांना अटक केली आहे. तपासावर परिणाम होऊ नये, या कारणासाठी पोलिसांनी पीडितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींची आणि त्यांना मदत करणाऱ्या महिलेची नावं उघड केलेली नाहीत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रीलान्स डिझायनर असलेली तरुणी तिच्या मित्राला भेटण्यासाठी गेली होती. परत येताना तिनं रॅपिडो बाईक टॅक्सी घेतली. त्यावेळी ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. बेंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त सी. एच. प्रताप रेड्डी म्हणाले, “तरुणी मद्यधुंद असल्याचं लक्षात येताच ड्रायव्हरने तिला त्याच्या घरी नेलं. तिथं त्यानं आणि त्याच्या मित्रानं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, एका आरोपीने तरुणीच्या मित्राला फोन केला. ती बेशुद्ध पडली होती म्हणून तिला आश्रय दिला होता, अशी बतावणी त्यानं तरुणीच्या मित्राला केली. तिच्या मित्रानंही आरोपीवर विश्वास ठेवला आणि तिला आपल्या घरी नेलं.”
मित्राच्या घरी गेल्यानंतर पीडित तरुणीला अंगदुखीचा त्रास होऊ लागला. शिवाय तिच्या शरीरावर जखमाही आढळल्या. त्यानंतर ती एका क्लिनिकमध्ये गेली. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचं सांगितलं. मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे तक्रार केल्यास प्रकरण आपल्या अंगलट येईल या भीतीने तरुणीनं पोलीस तक्रार न देण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे प्रकरण मेडिको-लीगल असल्यानं डॉक्टरांनी पोलीस तक्रार नोंदवली. हे वाचा - स्पेशल लेन्स, मायक्रो चिप, QR कोड; जुगाऱ्यांच्या हायटेक तंत्रज्ञानाने पोलीसही पोलिसांनी वेगानं तपास करून आरोपींना अटक केली. “चौकशी करतानाही एका आरोपीच्या प्रेयसीनं तरुणीची तब्येत बरी नसल्यानं तिला आसरा दिला होता, अशी बतावणी केली. मात्र, पुराव्यांच्या आधारे आरोपीची प्रेयसी खोटं बोलत असल्याचं सिद्ध झालं,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली. या प्रकरणातील एका आरोपीचा अशाच इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.