जयपूर, 1 मे : राजस्थानच्या (Rajasthan) झुंझुनूं (Jhunjhunu) जिल्ह्यात दोन सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार (Gang rape) करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्य हादरलं आहे. पण या घटनेशी संबंधित आणखी काही विचित्र घटनाही घडत आहेत. त्यामुळे नेमकं काय सुरुय या विचाराने पोलीसही चक्रावले आहेत. या प्रकरणाशी संबंधित घडणाऱ्या घटना हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं करत आहेत. त्यामुळे पोलिसांपुढील आव्हानं वाढताना दिसत आहेत. दोन बहिणींवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील एका आरोपीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणातील आणखी एका आरोपीने सोशल मीडियावर स्त:चा व्हिडीओ जारी करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. आपल्याला या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा दावा आरोपीने केला आहे. आरोपीने पोलिसांना 48 ते 72 तासांचा वेळ दिला आहे. या कालावधीत पोलिसांनी खरं काय ते समोर नाही आणलं तर आपण आत्महत्या करु, असं आरोपीने व्हिडीओत म्हटलं आहे. बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची आत्महत्या तर दुसऱ्या आरोपीचा आत्महत्या करण्याचा इशारा, यामुळे पोलिसांवरील दबाव वाढला आहे. संबंधित सामूहिक अत्याचार प्रकरणात सात आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यापैकी काही जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पण काही आरोपी हे अद्याप फरार आहेत. दरम्यान, फरार आरोपींपैकी एक असलेल्या सुमित ऊर्फ टोनी रणवां याने आपल्या गावाजवळ आत्महत्या केली. त्यानंतर आता आरोपी मोहम्मद शफीकचा व्हिडीओ समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांची देखील चिंता वाढली आहे. “मी या प्रकरणात दोषी आढळलो तर माझ्या आत्महत्येलाच शिक्षा मानली जावी. पण या प्रकरणात मी निर्दोष ठरलो तर माझं नाव या प्रकरणात गोवणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखळ करुन मला न्याय देण्यात यावा”, असं आरोपी मोहम्मद शफीक व्हिडीओत म्हटला आहे.
( ‘बाळासाहेबांचे मुल्यमापन कुणीच करू नये’, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार ) आपल्याला राजकीय षडयंत्रातून फसवलं जात आहे, आरोफी मोहम्मद शफीकचं असं म्हणणं आहे. संबंधित प्रकरणाची आपलं काहीच घेणं-देणं नाही. याशिवाय आपल्या पीडितेविषयी काहीच माहिती नाही. याशिवाय या प्रकरणातील इतर आरोपींसोबत आपला काहीच संबंध नाही, असं शफीकने म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन उत्तर द्यावं. पुढच्या 48 ते 72 तासात आपल्याला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करु, असा इशारा शफीकने दिला. दरम्यान, आम्ही या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी कोणत्याही निर्दोष व्यक्तीला या प्रकरणात फसवलं जाणार नाही, असं विधान अधिकाऱ्यांनी केलं आहे. तसेच शफीकच्या व्हिडीओची आपण दखल घेतली असल्याची प्रतिक्रिया पोलीस उपाधिक्षक सतपाल सिंह यांनी दिली. शफीक या प्रकरणात दोषी नसेल तर त्याला अटक केली जाणार नाही. त्याला आपलं म्हणणं समोर येऊन पोलिसांपुढे मांडायला हवं. त्याने पोलिसांना तपासात सहकार्य करावं, असं सतपाल सिंह म्हणाले.