हैदराबाद, 05 फेब्रुवारी : वाहतुकीचा नियम मोडल्यानंतरही (Traffic Rule) ट्रॅफिक पोलिसांशी (Traffic Police) वाद घालणारी मंडळी काही कमी नाहीत. पण, वीज विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं (Power Department Employee) ट्रॅफिक पोलिसांशी झालेल्या वादातून शहरातील गर्दीच्या भागातील ट्रॅफीक सिग्नल (Traffic Signal) आणि दोन पोलीस स्टेशनमधील वीज कट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
काय आहे प्रकरण?
तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील (Hyderabad) हा सर्व धक्कादायक प्रकार आहे. हैदराबादमधील ट्रॅफिक पोलीस कर्मचारी एन. रमेश यांनी एका अल्पवयीन मुलाला सिग्नलपाशी थांबवले होते. त्यानंतर त्या मुलानं हैदराबादमधील वीज विभागात काम करणाऱ्या ए. रमेश या कर्मचाऱ्याला मदतीसाठी फोन करुन बोलवले. रमेश यांनी तातडीनं घटनास्थळी जात अल्पवयीन मुलाला लावण्यात आलेला दंड रद्द करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच दंडाची पावती (Challan) फाडण्यात आल्यानं ट्रॅफिक पोलिसांनी तो दंड रद्द करण्यास नकार दिला.
(हे वाचा-रात्रीच्या काळोखात महिलेवर अॅसिडहल्ला, विरोध करताच उचललं हे पाऊल)
पोलिसांचा घेतला बदला
ट्रॅफिक पोलिसांनी दंड रद्द करण्यास नकार दिल्यानं संतापलेल्या रमेशनं त्यांचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात रमेशनं त्याच्या अधिकाराचा गैरवापर केला. रमेशनं हैदराबादमधील शापूरनगर या गर्दीच्या भागातील ट्रॅफिक सिग्नल बंद केला. रमेशच्या कृतीमुळे ऐन गर्दीच्या वेळी पोलिसांवरील कामाचा ताण आणखी वाढला.
रमेशचं इतक्यावरच समाधान झालं नाही, त्यानं शहरातल्या दोन पोलीस स्टेशनमधील लाईट देखील कट केली. पोलिसांना सुरुवातीला काही तांत्रिक कारणामुळे लाईट जाण्याचा प्रकार वाटला होता. त्यांनी संध्याकाळपर्यंत लाईट येण्याची वाट पाहिली. अखेर संध्याकाळी त्यांनी वीज विभागाशी संपर्क केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.
(हे वाचा-बारामती पोलिसांची कारवाई, पिस्तुल विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश)
फरार आरोपीला अटक
आपले बिंग फुटल्याचं लक्षात येताच रमेश फरार झाला होता. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शहरातील अनेक भागात छापे टाकले. अखेर गुरुवारी त्याला अटक करण्यात आली आहे. रमेशची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून त्याच्यावर कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Hyderabad, Traffic police