मुंबई 30 मे : लग्नाला 12 वर्षं उलटूनही मूलबाळ होत नसल्यानं पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना मुंबईजवळ अंबरनाथमध्ये रविवारी (28 मे 2023) घडली आहे. नीतू कुमारी मंडल (वय 30) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून, रोनीतराज मंडल (वय 37) असं आरोपी पतीचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. तसंच हत्येप्रकरणी आरोपी रोनीतराज मंडल याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय. अंबरनाथच्या ऑर्डिनन्स इस्टेटमधील एमपीएफ मैदानासमोर रोनीतराज मंडल हा पत्नी नीतू कुमारी मंडल सोबत वास्तव्याला होते. मूळचे बिहारमधील असलेल्या या दोघांचं 2011 साली लग्न झालं होतं. यानंतर 2016 साली हे दाम्पत्य अंबरनाथमध्ये राहायला आलं होतं. त्यांच्या लग्नाला 12 वर्षं झाली तरी त्यांना मूलबाळ होत नसल्यानं नीतू कुमारीची आयव्हीएफ ट्रिटमेंटही सुरू होती. मात्र याच कारणावरून रोनीतराज त्याच्या पत्नीशी नेहमी वाद घालत होता. रविवारी दुपारी रोनीतराज हा दारू पिऊन घरी आला. तेव्हा त्याचे पत्नीशी पुन्हा वाद झाले, आणि वादातून त्यानं पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तू मारून तिची हत्या केली. Delhi Crime : सैतान प्रियकराचे प्रेयसीवर सपासप 16 वार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून पोलीसही धक्क्यात अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी या प्रकरणी सांगितलं की, ‘रविवारी दुपारी रोनीतराजचे त्याच्या पत्नीशी आयव्हीएफ उपचारांवरून भांडण झाले. वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात त्याने शेजारी पडलेली जड लाकडी वस्तू घेऊन स्वतःच्या पत्नीवर वार केला. त्यामुळे ती जमिनीवर कोसळली व तिच्या डोक्याला मार लागल्यानं प्रचंड रक्तस्राव झाला. घटनेनंतर लगेचच आरोपी रोनीतराज घरातून निघून गेला व एक तासानंतर परत आला. त्यानंतर त्याने शेजाऱ्यांना अज्ञात हल्लेखोरांनी आपल्या पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली, व या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली.’ ‘पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता नीतू कुमारी हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला,’ असंही पोलीस निरीक्षक कोते यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, ‘आम्ही शेजाऱ्यांकडे तसंच रोनीतराज याच्याकडे हत्येबाबत चौकशी केली. या चौकशीदरम्यान रोनीतराज हा देत असलेल्या माहितीवरून आम्हाला त्याच्यावर संशय आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रोनीतराजला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला 2 जून 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.