प्रियांक सौरभ, प्रतिनिधी मुजफ्फरपूर, 19 एप्रिल : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. मुझफ्फरपूरच्या मोतीपूर पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी येथे एका नवविवाहित महिलेची तिच्याच पतीने हत्या केली होती. मंगळवारी तिचा मृतदेह नातेवाईकांनी मुलाच्या दारातच जाळला. ही घटना मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशाही गावची आहे.
आकाश असे आरोपीचे नाव आहे. गेल्या रविवारी आकाशची पत्नी ही स्वयंपाकघरात काम करत होती. यावेळी आकाश हा तिथे आला आणि त्याने हुंड्यासाठी पत्नी काजलच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार आहे. तर मृत मुलीच्या संतप्त नातेवाईकांनी दोन दिवसांनी आरोपी पतीच्या दारात मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. आकाशच्या दारातच मृताच्या घरच्यांनी मृत काजलचा मृतदेह जाळला. मृत काजलचे नातेवाईक म्हणाले की, तिचे सासरचे लोक दररोज काजलच्या अंत्यदर्शनाच्या जागेला पाहतील आणि या घटनेला आठवतील. तसेच जो कुणी त्या वाटेने जाईल, त्यांना कळेल की, अवघ्या 6 महिन्यांतच या घरात आपल्या मुलीची हत्या झाल्याचे कळेल. तसेच या घरातील लोक हुंड्यासाठी काहीही करू शकतात. तर याप्रकरणी मुजफ्फरपूर पश्चिमचे डीएसपी अभिषेक आनंद यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होईल आणि जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा होईल, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.