पुणे 09 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातूनही दररोज हत्येसारख्या गंभीर घटना समोर येत आहेत. अशातच आता चाकण परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये जेवणात मीठ जास्त झाल्याने हॉटेल चालकाने आचाऱ्याचा खून केला आहे. चालकाने भावाच्या मदतीने ही हत्या केली आहे.
या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आबे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी ढाबा चालक ओंकार केंद्रे वय 21 वर्ष आणि त्याचा भाऊ कैलास केंद्रे या दोघांना ताब्यात घेतलं आहे.
AC रिपेअर करायला आला अन् 5 वर्षीय चिमुकलीला लिफ्टमध्ये नेत..; तरुणाच्या कृत्यानं पनवेल हादरलं
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव इथे चाकण रोडवर एक धाबा आहे. या ढाब्यावर प्रोसेंजीत गोराई नावाचा परप्रांतीय कामगार आचारी म्हणून काम करत होता. याच कामगाराची ढाबा चालकाने आपल्या भावाच्या मदतीने जेवणात मीठ जास्त झाल्यामुळे हत्या केली. ही घटना 26 ऑक्टोबर रोजी घडली. आधी त्यांनी आचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि नंतर दांडकं आणि लोखंडी रॉडने मारहाण करत जीव घेतला.
इतकंच नाही तर आचाऱ्याची हत्या केल्यानंतर दोघा भावांनी त्याचा मृतदेह खोलीमध्ये लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांनी हा मृतदेह डोंगराळ भागात नेऊन फेकला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला. पोलिसांनी वेषांतर करून या ढाब्यावर भेट देत घटनेची माहिती घेतली. यानंतर दोघा भावांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं.
पोलीस चौकशीत त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिलं. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा मान्य केला. विशेष बाब म्हणजे या दोघा भावांनी ही हत्या ढाब्यावरील इतर कामगारांच्या समोरच केली होती. मात्र याबाबत कोणाला सांगितलं तर तुमचीही अशीच अवस्था करेल, अशी धमकी त्यांनी इतरांना दिली होती. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder news, Pune crime news