सुरत, 14 फेब्रुवारी : ज्या वयात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहयचं, आयुष्यात काही तरी करण्याचा संकल्प करायचा त्याच वयात प्रेयसीसोबत लग्न करण्याच्या उद्देशानं पळालेल्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर (Minor Child) बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याची प्रेयसी देखील अल्पवयीन असून ती 15 वर्षांची आहे.
काय आहे प्रकरण?
गुजरात (Gujrat) मधील सुरतमध्ये राहणारी ही अल्पवयीन मुलगी 3 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. त्यानंतर तिच्या घरच्यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तिच्या मोबाईल फोनच्या आधारे तिचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती भावनगरमध्ये (Bhavnagar) असल्याचं त्यांना आढळले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पण तिथं ती मुलगी नव्हती. तिचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर भावनगरमधील एका 16 वर्षाच्या मुलाला ती सातत्यानं कॉल करत असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी त्या नंबरवर फोन केल्यानंतर लगेच बेपत्ता मुलीचा तपास लागला. ही दोघंही 12 तारखेला सुरतमध्ये परतली आहेत.
( वाचा : YouTube वर शिकला ऑनलाईन फ्रॉड; सासूच्याच अकाउंटमधून उडवले लाखो रुपये )
सोशल मीडियातून झाला संपर्क
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ही दोघंही सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आली होती. 3 फेब्रुवारी रोजी तो मुलगा भावनगरहून सुरतमध्ये होता. त्यानंतर ती दोघं लग्न करण्याच्या उद्देशानं भावनगरला पळाली. तिथं ते दोघं एका भाड्याच्या घरात राहत होती. आपल्यामध्ये शारीरिक संबंध झाले असल्याची कबुली या दोघांनी दिली आहे.’
पोलिसांनी आरोपी मुलावर बलात्कारासह POCSO कायद्यांतर्गत वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. तर मुलीला मेडिकल तपासणीनंतर त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आली आहे. आरोपी मुलाची रवानगी सुरतमधील रिमांड होममध्ये करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.