पणजी, 9 जानेवारी : गोवा हे भारतीयच नव्हे, तर अनेक परदेशी नागरिकांचंही आवडीचं पर्यटनस्थळ आहे. गोव्यातले स्वच्छ समुद्रकिनारे आणि तिथली संस्कृती सगळ्यांना भुरळ घालते; मात्र गोव्याच्या या पर्यटनसंस्कृतीला काही गोष्टींमुळे काळिमा फासला जातोय. त्यात सेक्स ट्रॅफिकिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. गोव्यातली काही स्पा सेंटर्स आणि क्लबमध्ये सेक्स ट्रॅफिकिंग केलं जातंय. विशेष गोष्ट अशी, की गोवा पोलिसांकडूनही त्याबाबत फारशी कारवाई होताना दिसत नाही. ‘दैनिक भास्कर’ने त्याबाबत वृत्त दिलंय. गोव्यातल्या सेक्स वर्कबाबत दैनिक भास्करनं एक शोधमोहीम राबवली. त्याअंतर्गत गोव्यातली स्पा सेंटर्स आणि क्लबमध्ये अनधिकृतरीत्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं समोर आलं. गोव्यात सेक्स ट्रॅफिकिंग करणारे दलाल ग्राहकांना सव्हिस चार्जेस सांगतात. बॉडी मसाजसाठी 3 हजार, बॉडी टू बॉडी मसाज 4 हजार आणि फुल सर्व्हिस 5 हजारांमध्ये दिली जाते. पोलिसांना दर महिन्याला कमिशन दिलं जातं, असं स्पा सेंटरमध्ये काम करणारे सांगतात. तसंच 18 ते 35 वयोगटातल्या महिला तिथं असल्याचंही ग्राहकांना सांगितलं जातं. अशा प्रकारच्या स्पा सेंटरमध्ये ग्राहकांना लुटण्याच्याही घटना घडतात. फुल सर्व्हिस देण्याचं सांगून ग्राहकांकडून 10 हजार रुपये घेतात आणि आत गेल्यावर 45 मिनिटांऐवजी 10 मिनिटांमध्येच ग्राहकांना बाहेर पाठवतात. ग्राहकांनी तक्रार केल्यावर तुम्हाला आणणाऱ्या दलालांशी बोला असं सांगतात. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या एका रिपोर्टनुसार, गोव्यातल्या वेश्या व्यवसायासाठी उत्तर भारत, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर मुली आणल्या जातात. युक्रेन, उझबेकिस्तान, रशिया, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया या देशांमधूनही मुली येतात. या मुलींना टुरिस्ट, मेडिकल किंवा वर्क व्हिसावर आणलं जातं. गोव्यातल्या स्थानिक महिलांचाही यात समावेश असतो. या मुलींना बाइक, स्कूटी किंवा टॅक्सीमधून अड्ड्यावर पोहोचवलं जातं. या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्यावर गोव्यातल्या शहराबाहेरच्या भागात भाड्याच्या घरात किंवा स्वस्तातल्या हॉटेल्समध्ये ठेवलं जातं. वाचा - 21 वर्षांच्या मुलाला संपवलं, भर बाजारात चौघांनी चाकूने भोसकलं, कल्याणमध्ये खळबळ या संदर्भात तपास केल्यावर असं लक्षात आलं, की गरीब घरातल्या मुली नाईलाजास्तव या व्यवसायात येण्याचं प्रमाण जास्त आहे. काही वेळा त्यांच्या जवळच्या व्यक्तीच त्यांना या व्यवसायात ढकलतात. मसाज पार्लर, ब्युटी पार्लर, कसिनो किंवा बांधकामाच्या साइटवर नोकरीचं आमिष त्यांना दाखवलं जातं. दर महिना 15-20 हजार रुपये पगार देण्याच्या बोलीवर त्यांना आणलं जातं, असं मुलींचं म्हणणं आहे. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांमधून स्थानिक व्यक्तींच्या मदतीनं या मुलींना आणण्यात येतं. या राज्यांमध्ये दलालांचं मजबूत जाळं आहे. तसंच त्यांचे खास वकीलही आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दलाल त्यांचं जाळं विस्तारतात. वेश्या व्यवसायातले दलाल वर्तमानपत्रात जाहिराती देऊन महिलांना आकर्षित करतात. व्हिडिओ कॉल्सवरून मुलाखती घेतात. निवडीचं पत्रही पाठवतात. विमानाचं तिकिटही देतात. मग निश्चित स्थळी पोहोचल्यावर त्यांना फसवून गोव्याला आणलं जातं व या व्यवसायात आणलं जातं. ग्राहकांना या मुलींचे फोटो पाठवून निवड करण्यास सांगितलं जातं. वाचा - दिल्ली अपघात प्रकरणी आरोपींची मोठी कबुली; गाडी न थांबवण्याचं सांगितलं कारण गोव्यात आलेल्या पर्यटकांची माहिती काढून दलाल त्यांना ग्राहक बनवतात. या दलालांचं हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांसोबतही सेटिंग असतं. गोव्यात स्पा सेंटर्सप्रमाणेच क्लब्जमध्येही वेश्या व्यवसाय चालतो. जे पर्यटक एकटे असतात, त्यांना ग्राहक म्हणून अशा मुलींबाबत माहिती पुरवली जाते. कलंगुटमधल्या चावला रेस्टॉरंटच्या मागे असलेल्या व्हाइट हाऊउ या क्लबमध्येही असा व्यवसाय चालतो अशी माहिती मिळाली होती; मात्र आत जाताना ग्राहकांना मोबाइल फोन बंद करावा लागतो. क्लबमध्ये ग्राहकांना लुटण्याचा प्रकारही सर्रास होतो. पैसे न भरल्यास बाऊन्सरकडून धमक्या दिल्या जातात. ‘दैनिक भास्कर’ने त्याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्या क्लबवर जाऊन चौकशीही केली; मात्र त्यात काही हाती लागलं नाही, असं त्यांनी सांगितलं.
याबाबत गोव्यातले सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेरलेक यांचं म्हणणं आहे, की गोवा पोलिसांची इंटेलिजन्स टीम भ्रष्ट झाली आहे. वेश्या व्यवसाय गोव्यात खुलेआम चालू आहे. उत्तर गोव्यात हा प्रकार जास्त सुरू आहे; मात्र त्यावर कडक कारवाई केली जात नाही. गोव्यात अनेक स्पा सेंटर्स आणि क्लब्ज आहेत. काही ठिकाणी अशा प्रकारे वेश्या व्यवसायही सुरू असतात. अनेक ग्राहक त्याला फसतात व अनेक मुलींना बळजबरी या व्यवसायात उतरवलं जातं. त्याबाबत कठोर कारवाई होणं जरूरी आहे.