हल्दवानी, 19 जुलै : प्रेमसंबंध, अनैतिक संबंधांतून गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न होत आहे. उत्तराखंडमधल्या हल्दवानीतील एक महिला स्थानिक व्यावसायिकाला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती. पण नंतर तिला त्याच्यापासून दूर व्हायचे होते. मात्र, तो तिला सोडायला तयार नव्हता. शेवटी या प्रकाराला कंटाळून या महिलेनं व्यावसायिकाची हत्या केली. तिने अत्यंत हुशारीने नियोजनबद्ध कट रचून व्यावसायिकाची हत्या घडवून आणली. या महिलेने या व्यावसायिकाची हत्या करण्यासाठी नेमका कसा कट रचला आणि पोलीस तपासातून काय निष्पन्न झालं ते जाणून घेऊया. उत्तराखंडमधल्या हल्दवानीमध्ये एका महिलेनं एका व्यावसायिकाची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे आणि या व्यावसायिकामध्ये काही वर्षांपूर्वी प्रेसमबंध सुरू झाले आणि दोन्ही रिलेशनशिपमध्ये आले. मात्र, आता तिला त्याच्यापासून सुटका करून घ्यायची होती. त्यासाठी ती हरतऱ्हेने प्रयत्न करत होती. दरम्यान, 15 जुलै रोजी हल्दवानीमधल्या तीन पानी भागात पोलिसांना एका कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. या व्यक्तीच्या पायावर सर्पदंशाच्या खुणा आढळून आल्या. हा मृतदेह अंकित चौहान या स्थानिक व्यावसायिकाचा होता.
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर अंकितच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर 17 जुलै रोजी आयपीसी कलम 369/23 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. आत्तापर्यंतच्या तपासादरम्यान या प्रकरणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नैनितालतचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पंकज भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ``या हत्या प्रकरणात एकूण पाच जणांचा सहभाग असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉली उर्फ माही ही एकेकाळी अंकित चौहानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. माही अनेक वर्षांपासून अंकितला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती. पण नंतर तिला त्याच्यापासून मुक्त व्हायचे होते. मात्र, अंकित तिच्यापासून दूर जायला तयार नव्हता.`` तपासादरम्यान, या हत्या प्रकरणात एका गारूड्याचा सहभाग असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. अंकितच्या पायाला सर्पदंश त्याने घडवून आणला आहे. या गारूड्याला पोलिसांनी अटक केली आहे. `अंकितच्या पायाला सर्पदंश व्हावा यासाठी माहीने एका गारूड्याला पैसे देऊन संगनमताने हत्येचा कट रचला. या नियोबद्ध कटानुसार अंकितच्या पायाला सर्पदंश करवल्याने त्याचा मृत्यू झाला,`` असे पंकज भट्ट यांनी सांगितले. सर्पमित्राला आपल्या बाजूने करण्यासाठी माहीने त्याच्यासोबत दोनदा शारीरिक संबंधही ठेवले होते. तसेच विषारी साप आणण्यासाठी त्याला 10 हजार रुपयेही दिले होते. या सर्पमित्राला तिने आपला गुरू मानायला सुरुवात केली होती. खुद्द सर्पमित्राने पोलिस कोठडीत हा खुलासा केला आहे. सध्या माहीसह अन्य तीन आरोपी फरार आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.