कानपूर : प्रेमाला विरोध करणाऱ्या आई-वडिलांचा खून मुलीनं तिच्या दोन प्रियकरांच्या मदतीनं केल्याचा धक्कादायक प्रकार कानपूरच्या बर्रा भागातल्या ईडब्ल्यूएस कॉलनीत घडला आहे. संबंधित मुलीनं तिच्या भावालादेखील ज्यूसमध्ये विष घालून मारण्याचा प्रयत्न केला; पण सुदैवाने तिचा भाऊ वाचला. ही घटना 5 जुलै 2022 रोजी घडलेली असून, तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. 5 जुलै 2022 रोजी कानपूरच्या बर्रा भागातल्या ईडब्ल्यूएस कॉलनीतील एका घराबाहेर सकाळीच लोकांची गर्दी जमली होती. काही वेळानं पोलिसही तेथे आले. पोलिसांनी जेव्हा घरात प्रवेश केला, तेव्हा समोर दोन जणांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांना दिसलं. मुन्नालाल (वय 61) व त्यांची पत्नी राजदेवी (वय 55) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं होती. ही दोघं मुलगी कोमल आणि मुलगा अनूपसोबत त्या घरात राहत होती. या दुहेरी हत्याकांडाने सर्वांनाच गोंधळात टाकलं. कोमलचं ठरलं होतं लग्न निवृत्त ऑर्डिनन्स कर्मचारी मुन्नालाल आणि त्यांची पत्नी राजदेवी हे दोघेही मुलगी कोमलच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र होते. त्यांचा मुलगा अनूपचा त्याच्या पत्नीशी वाद सुरू होता. ती लग्नानंतर लगेचच सासर सोडून माहेरी गेली होती; पण कोमलचं लग्न होण्यापूर्वीच मुन्नालाल व राजदेवी या दोघांची हत्या झाली. त्यामुळे या परिवारासह संपूर्ण परिसर हादरला होता. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास केल्यानंतर या दोघांच्या खुनाचा कट त्यांची मुलगी कोमल हिनेच रचल्याचं समोर आले व सर्वांनाच धक्का बसला. कोमलनेच दिली होती अनूपला खुनाची माहिती मध्यरात्री आई-वडिलांचा गळा चिरून खून झाल्याचं मयत दाम्पत्याचा मुलगा अनूप याने पोलिसांना सांगितलं होतं. त्याने सांगितलं होतं, की घटनेच्या दिवशी तो पहिल्या मजल्यावरच्या रूममध्ये झोपला होता. त्याचे आई-वडील आणि बहीण तळमजल्यावरच्या रूममध्ये झोपले होते. वडील बाहेरच्या रूममध्ये होते, तर आई आणि बहीण आतल्या रूममध्ये झोपले होते. पहाटे बहीण कोमलने त्याला येऊन उठवलं आणि आई-वडिलांचा कोणी तरी खून केल्याचं सांगितलं. अनूपने आणखी एक महत्त्वाची गोष्ट पोलिसांना सांगितली. तो म्हणाला, ‘घटना घडली त्या रात्री मला चक्कर येत होती, आणि माझ्या जेवणात कोणी तरी काही तरी मिसळले असल्यासारखं वाटत होतं.’ आश्चर्याची बाब म्हणजे घटनेच्या दिवशी त्यांच्या घरात बाहेरून कोणीही आले नव्हते. त्यामुळे अनूपच्या जबाबावरून दोन प्रश्न उपस्थित झाले. पहिला म्हणजे, खुनापूर्वी घरात बाहेरून कोणीही आले नव्हते. मग त्यांच्या जेवणात अंमली पदार्थ कोणी मिसळला? आणि दुसरा म्हणजे, त्याची बहीण त्याच्या आईसोबत झोपली होती, तेव्हा तिला त्याच्या आईवर झालेल्या हल्ल्याची माहिती का मिळाली नाही? हाच धागा पकडून पोलिसांनी तपास केला आणि धक्कादायक सत्य पुढे आलं. पोलिसांना कोमलने काय सांगितलं होतं? अनूपचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी कोमलचा जबाब घेतला. पोलिसांना कोमलनेही जवळपास तीच गोष्ट सांगितली जी तिचा भाऊ सांगत होता. म्हणजेच मध्यरात्री मारेकरी घरात घुसले आणि आई-वडिलांची हत्या करून निघून गेले. तिला जाग येईपर्यंत मारेकरी तेथून निघून गेले होते; मात्र कोमलने एक नवीन गोष्ट सांगितली, की तिने तीन बुरखाधारी व्यक्तींना घरातून पळताना पाहिलं होतं. त्यात तिचा भाऊ अनूपचा लहान मेहुणा मयंक गुप्तादेखील होता. हेही वाचा : ऑस्ट्रेलियन महिलेची हत्या करून मायदेशी पळाला, आरोपी भारतीयाला दिल्लीतून अटक त्यानंतर, पोलिसांनी पुन्हा एकदा अनूपशी बोलायचं ठरवलं. कारण अनूपचं पत्नीसोबत घटस्फोटाचं प्रकरण सुरू होतं. पोटगी म्हणून पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी अनूप आणि त्याच्या कुटुंबीयांकडे 50 लाख रुपयांची मागणीही केली होती. त्यामुळे कोमलने दिलेल्या जबाबानंतर तिच्या आई-वडिलांची हत्या अनूपच्या सासरच्या मंडळींनी केली असल्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी तपास सुरू केला. यासोबतच अनूपने शेजारच्या एका दुकानदारावरही संशय घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी अनूपच्या सासरच्या मंडळींचीही चौकशी सुरू केली होती. पोलिसांनी रस्त्यावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज पाहण्याचा निर्णय घेतला. फुटेजमध्ये वेगळीच कहाणी दिसत होती. फुटेजमध्ये फक्त एकच बुरखाधारी व्यक्ती रिकाम्या हाताने घराकडे जाताना दिसत होती आणि सुमारे तासभरानंतर तो पुन्हा घरातून निघून पायीच जाताना दिसत होता; पण तेव्हा त्याच्या हातात एक बॅग होती. पोलिसांना आला कोमलवरच संशय या घटनेचा तपास करताना अशा तीन गोष्टी समोर आल्याने पोलिसांना कोमलवर संशय आला. पहिला म्हणजे मारेकर्यांनी घरात घुसून हा खून केला; मात्र घरातल्या कोणालाही काही कळलं नाही. विशेषतः कोमल स्वतः तिच्या आईसोबत एकाच बेडवर झोपली होती. दुसरं म्हणजे कोमलने सांगितलं, की तिने तिघांना पळताना पाहिलं होतं. मग प्रश्न असा होता, की तिने आरडाओरड करून इतरांना का उठवलं नाही? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मारेकरी इतक्या सहजपणे घरात कसे घुसले? हेही वाचा : गर्दीच्या ठिकाणीच वडापाव विक्रेत्यांवर कोयत्यानं हल्ला, घटनेनं नाशिक हादरलं, Live Video
पोलिसी खाक्या दाखवताच कोमलनं सांगितलं सत्य
कोमलवर संशय येताच पोलिसांनी तिची विचारपूस सुरू केली. तेव्हा पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देताना ती गोंधळू लागली. विशेषत: घराचा दरवाजा उघडा कसा होता, नराधमांना पाहूनही ती गप्प का राहिली, अशा प्रश्नांची उत्तरं तिला देता येत नव्हती. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच कोमलने तिचा प्रियकर रोहितसोबत मिळून आई-वडिलांच्या हत्येचा कट रचल्याचं कबूल केलं. तसंच भाऊ अनूप यालाही मारण्याचा कट केला होता; पण तो वाचला असंही ती म्हणाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रोहितला ताब्यात घेऊन, त्याच्याकडे या दुहेरी हत्याकांडाची चौकशी सुरू केली. त्यानेही हा गुन्हा केल्याचं कबूल केलं. म्हणून केला आई-वडिलांचा खून या दुहेरी हत्याकांडाच्या तपासादरम्यान पोलिसांना कळलं, की कोमलला मुन्नालाल आणि राजदेवी यांनी 24 वर्षांपूर्वी एका नातेवाईकाकडून दत्तक घेतलं होतं. कोमलला त्यांनी अगदी स्वतःच्या मुलीसारखे वाढवले; मात्र तिनेच त्यांची हत्या केली. पोलिसांना चौकशीत आरोपी कोमलनं सांगितलं की, तिने प्रियकर रोहितसोबत मिळून या हत्येचा कट रचला होता. तिला आई-वडिलांशिवाय तिचा भाऊ अनूपलाही मारायचं होतं. या उद्देशाने तिने घटनेच्या दिवशी रात्री आई-वडिलांना, तसंच भावाला विषमिश्रित ज्यूस दिला होता; मात्र भाऊ ते ज्यूस सगळं प्याला नव्हता. तिचे आई-वडील ज्यूस पिऊन झोपी गेले. खुनाच्या वेळीही तिने वरच्या मजल्यावर जाऊन तिचा भाऊ अनूप याला प्रियकराकरवी मारता यावं, म्हणून मध्यरात्री त्याला उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र गाढ झोपेत असलेल्या अनूपने दार उघडलं नाही. त्यानंतर कोमलच्या आई-वडिलांचा खून करून रोहित तेथून निघून गेला होता. त्यानंतर प्लॅन बीनुसार कोमलने भावाला उठवून आई-वडिलांचा खून झाल्याचं सांगून नाटक सुरू केलं. पहिल्या प्रियकराची मदत या दुहेरी हत्याकांडात कोमल आणि रोहितसोबतच मुंबईत सैन्यात असलेला कोमलचा पहिला प्रियकर राहुल याचाही सहभाग असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. विशेष म्हणजे राहुल हा रोहितचा सख्खा भाऊ होता. राहुल हा तिचा पहिला प्रियकर. त्याच्याच माध्यमातून रोहित आणि कोमलची ओळख झाली होती. राहुलने कोमलला विष उपलब्ध करून दिलं होतं. एवढंच नाही, तर कोमलला खुनात मदत करण्यासाठी त्याने भाऊ रोहितला कोमलच्या घरी पाठवलं होतं; मात्र, कोमल तसंच दोन्ही भावांची रिमांडवर चौकशी करूनही राहुलने हत्येसाठी विष कुठून आणलं, याचा शोध पोलिसांना लागलेला नाही. कोमलने राहुल व रोहित या दोघांनाही तिच्या प्रेमाच्या जाळ्यात बांधलं होतं. या दोघांपैकी एकासोबत तिला लग्न करायचं होतं; मात्र तिच्या आई-वडिलांचा या लग्नाला विरोध होता. याच कारणाने कोमलने तिच्या आई-वडिलांचा खून केल्याचं पोलिस तपासात समोर आलं. शिवाय, भावाच्या घटस्फोट प्रकरणामुळे आई-वडिलांची संपत्ती आपल्या हातून जाईल अशीही भीती तिच्या मनात होती. त्यामुळे तिला भावालाही संपवायचं होतं. या प्रकाराने संपूर्ण कानपूर परिसर हादरला होता. मुलीनेच आई-वडिलांचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला होता.