गाझियाबाद, 29 डिसेंबर: आजुबाजूला एखादी घटना घडत असेल तर तिचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करणं ही सध्या अनेकांना गरज वाटू लागली. मात्र त्यामुळे संवेदनशीलता, माणुसकी या गोष्टी मात्र लोप पावत चालल्या आहेत. अगदी हल्ले, अपघात यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सर्रास पाहायला मिळतात. असाच प्रसंग उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद जिल्ह्यात घडला आहे. व्यवसायातील वैरामुळे दोन मित्रांनी अजय कुमार या फुलविक्रेत्या 23 वर्षांच्या तरुणावर हल्ला केला. त्याला रस्त्यात लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. पण रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंनी मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अजयला मदत करण्याऐवजी या घटनेचा व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. वेळेवर मदत न मिळाल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला. या मृत तरुणाचं नाव अजय कुमार (23) आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती गाझियाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक इराज राजा यांनी दिल्याचं टाइम्स नाऊ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंत नागरिकांमध्ये प्रक्षोभ पाहायला मिळतो आहे. सोशल मीडियावर याबाबत कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ते म्हणाले, ‘लोणी येथील मंदिराबाहेर गोविंदचं फुलांचं दुकान अनेक वर्षांपासून आहे. आठ महिन्यांपूर्वी अजय कुमारने नवं दुकान सुरू केलं होतं त्यामुळे गोविंदच्या व्यवसायावर परिणाम व्हायला लागला. आरोपी गोविंद शर्मा (21 रा. सरिता विहार, दिल्ली) आणि त्याचा मित्र अमित कुमार (22 रा. सरिता विहार, दिल्ली) यांनी अजयवर हल्ला करायचं ठरवलं. सोमवारी तो दुकान बंद करून घरी जाण्यासाठी रिक्षेत बसत असताना अंकुर विहार भागात या दोघांनी त्याला रिक्षेतून बाहेर काढत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.’ हल्लेखोरांनी अजयच्या डोक्यात 3 ते 4 वेळा मारलं त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तरीही बाजूने जाणाऱ्या लोकांनी त्या हल्ल्याचा व्हिडिओ तयार केला पण अजयला मदत केली नाही. पोलिसांना घटनेची माहिती कळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अजयला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा मृत्यु झाला, असंही राजा यांनी सांगितलं.