रहमान, प्रतिनिधी बस्ती, 3 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच सामूहिक बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात एका 10 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पैकवलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हा सामूहिक बलात्कार गावातील 13 ते 14 वर्षे वयोगटातील तीन अल्पवयीन मुलांनी केला, असा आरोप करण्यात आला आहे. आरोपींनी गैरकृत्य केल्यानंतर आरोपी पीडितेला बांबूच्या जंगलात सोडून पळून गेले. माहिती मिळताच पोलिस अधीक्षक (एसपी) गोपाल चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी पाहणी केली. यानंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री गावात लग्नसमारंभ होता. पीडित 10 वर्षांची मुलगीही या लग्न समारंभात सामील होण्यासाठी गेली होती. रात्री उशिरा ती लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना वाटेत तीन मुलांनी तिला पकडून बळजबरीने जवळच असलेल्या बांबूच्या झाडात नेऊन तिच्यासोबत गैरकृत्य केले.
सामूहिक बलात्कारानंतर पीडिता बेशुद्ध पडल्यावर तिघेही आरोपी तिला सोडून पळून गेले. दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. यानंतर नातेवाईकांना पीडित मुलगी झाडामागे बेशुद्ध अवस्थेत आढळली. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पीडितेला स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. तसेच त्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या गावातील तीन मुलांची नावे सांगितली. आरोपींची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. एसपी गोपाल चौधरी यांनी सांगितले की, सामूहिक बलात्काराच्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्याठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणची पोलिसांनी पाहणी केली असून पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

)







