लातूर, 12 ऑक्टोबर : लातूर शहरातील कातपूर रोडवरील राजकुमार अग्रवाल यांच्या घरी आज पहाटे पावणे चारच्या सुमारास चोरट्यांनी लूटमार करीत तब्बल 2 कोटी 25 लाख रोकड आणि 73 लाख रुपये किमतीचं सोनं लंपास केले असल्याची घटना घडलीय. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कव्हा नाका रिंगरोड परिसरातील कन्हैया नगरात ही घटना घडली. पहाटेपासून रात्रीपर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. मात्र याबाबतची चर्चा संबंध लातूर जिल्ह्यात दिवसभर सुरु होती. नेमका किती मुद्देमाल, किती सोने, किती रोकड गेली याबाबत ठरविता येत नव्हती. मात्र रात्रीच्या सुमारास राजकमल अग्रवाल यांनी अखेर विवेकानंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर नेमका किती मुद्देमाल आणि रोकड दरोडेखोरांनी चोरून नेलीय हे आता स्पष्ट झालंय. दरम्यान, लातूर शहरातील आजपर्यंतची ही सगळ्यात मोठी चोरी असून आता गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांसमोर चोरट्यांना मुद्देमालासह पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झालंय. कारण या ठिकाणचे सीसीटीव्ही बंद होते. शिवाय दरोडेखोरांनी कोणताही क्लू घटनास्थळी सोडला नाही. ( मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुंडांची तलवार-काठ्या घेऊन दहशत; CCTV व्हिडीओ समोर ) दरम्यान, चोरट्यांनी पिस्टल, कोयता आणि चाकूचा धाक दाखवून चोरी केली असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिलीय. चोरट्यांच्या टोळीत पाच जणांचा समावेश असून हे चोर 25 ते 30 वर्ष वयोगटातील असल्याचं देखील अग्रवाल यांनी फिर्यादीत म्हटलंय. विशेष म्हणजे हे सगळे गुन्हेगार मराठीत बोलत होते. त्यामुळे पाळत ठेऊन ही चोरी झाल्याचा अंदाज असला तरी या दरोडेखोरांना पकडणं हे लातूर पोलिसांसमोर आव्हान बनलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.