गाजियाबाद 07 मार्च : उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इथे एका विद्यार्थ्यानं (Student) आपल्या शिक्षकावर गोळी झाडली आहे. या घटनेत शिक्षकाचा जीव वाटला आहे, मात्र ते काही प्रमाणात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. तर, पीडित शिक्षकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गाजियाबादच्या मुरादनगर इथलं आहे. असं म्हटलं जात आहे, की आपल्या शिक्षकानं ओरडल्यानं रागाच्या भरात बारावीच्या या मुलानं आपल्या तीन मित्रांसोबत मिळून हे कृत्य केलं आहे. त्यानं शाळेच्या बाहेर येताच शिक्षकावर गोळी चालवली आहे. या घटनेत शिक्षक जखमी झाले. यानंतर हवेत गोळीबार करत या विद्यार्थ्यांनी याठिकाणाहून पळ काढला. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. पोलिसांची सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. घटनेत जखमी झालेल्या शिक्षकाचं नाव सचिन त्यागी राधेश्याम असं आहे. ते सरस्वती विहार कॉलनीजवळील कृष्णा विद्या निकेतन या शाळेत शिकवतात. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सचिन त्यागी आपल्या दुचाकीवरुन घराकडे निघाले होते. इतक्यात शाळेच्या बाहेर निघताच स्कूटीवर चार मुलं आली आणि त्यांनी सचिन त्यागी यांच्यावर गोळीबार केला. सचिन त्यागी यांनी सांगितलं, की बारावीच्या वर्गात दुपारी 12 वाजून 15 मिनीटांच्या आसपास एक विद्यार्थी इतरांशी चुकीच्या पद्धतीनं बोलत असल्यानं ते त्याच्यावर ओरडले होते. याच कारणामुळे राग आल्यानं या विद्यार्थ्यानं आपल्या 3 मित्रांसह मिळून शिक्षकावर हल्ला केला. या विद्यार्थ्यानं वर्गातच शिक्षकाला धमकीदेखील दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही आरोपी एकाच गावचे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. एसपी ग्रामीण डॉ. ईरज राजा यांनी सांगितलं, की शिक्षकानं दिलेल्या तक्रारीनुसार या विद्यार्थ्यावर आणि त्याच्या मित्रांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.