पोर्ट (पाकिस्तान), 24 जानेवारी : काही पालक लग्न करण्यासाठी पाल्यांच्या पसंतीला मान्यता देतात, पण ही संख्या बरीच कमी आहे. पालक लव्ह मॅरेज स्वीकारत नसल्याने अनेक तरुण-तरुणी पळून जातात. काही प्रकरणांमध्ये ते पळून गेल्यानंतर पालक झालं ते झालं असं समजून बोलणं टाळतात. पण काही मात्र राग मनात धरून असतात. ते मनात राग असलेले पालक वेळ पडल्यास मुलांचा जीव घेण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत.
आपला मुलगा किंवा मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आपली समाजातील प्रतिष्ठा धुळीस मिळाली, असा विचार ते करतात. त्यामुळे ते बदल्याच्या भावनेने मुलांचा जीवही घेतात. अशा ऑनर किलिंगच्या अनेक घटना आपल्याला रोज ऐकायला मिळतात. अशीच एक घटना पाकिस्तानमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेत कोर्टातच एका पित्याने मुलीची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केली आहे. या संदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलंय.
पाकिस्तानच्या पोर्ट शहरातील भर कोर्टात एका नवविवाहित महिलेची तिच्या वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना सोमवारी घडली आहे. तसेच हे प्रकरण ऑनर किलिंगचं असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. मृत महिला कराचीमधील पिराबाद येथील रहिवासी होती. तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं आहे हा जबाब नोंदवण्यासाठी ती कराची सिटी कोर्टात आली होती, तेव्हा ही घटना घडली, असं पोलिसांनी सांगितलं.
ही मृत महिला आदिवासी भागातील वझिरिस्तानची असून, तिने नुकतंच तिच्या घराच्या शेजारच्या डॉक्टरशी लग्न केलं होतं, असं एका एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. "जेव्हा ती सोमवारी सकाळी सिटी कोर्टात तिचा जबाब नोंदवण्यासाठी आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. त्यात ती जागीच ठार झाली आणि एक पोलीसही या घटनेत जखमी झाला. पोलिसाची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे," असं वरिष्ठ पोलीस अधीक्षक शब्बीर सेथर यांनी सांगितलं.
हेही वाचा - Instagram वर जुनैद झाला बंटी, प्रेमाच्या जाळ्यात फसवत तरुणीसोबत केलं भयानक कांड
आरोपीला अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली बंदुक जप्त करण्यात आली आहे. “जवळजवळ प्रत्येक ऑनर किलिंग प्रकरणात वडील, पती, भाऊ किंवा इतर कोणताही पुरुष नातेवाईक आरोपी असतो. या महिलेने लग्नानंतर तिच्या पालकांचं घर सोडलं होतं, यामुळे तिचे वडील रागात होते,” अशी माहिती पोलीस अधीक्षक शब्बीर सेथर यांनी दिली.
पाकिस्तानातील धक्कादायक परिस्थिती -
पाकिस्तानच्या विविध भागांत दरवर्षी शेकडो महिलांना कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा मलीन केल्याच्या नावाखाली मारलं जातं. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने गेल्या दशकात दरवर्षी सरासरी 650 ऑनर किलिंगच्या घटनांची नोंद केली आहे. परंतु, बरेच जण पोलिसांत तक्रार देत नाहीत, त्यामुळे खरी संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Court, Crime news, Daughter, Father, Murder