हैदराबाद, 6 डिसेंबर : प्रेम आणि ब्रेकअप या बाबी सध्याच्या काळात अनेक गुन्ह्यांचं, तसंच दुष्कृत्यांचं कारण ठरत आहेत. देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांतून याबद्दलच्या बातम्या येत असतात. ही त्यातलीच एक बातमी समोर आली आहे. या घटनेत एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडचा गळा चिरून तिला ठार केलं. तिने ब्रेक-अप करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. इतकंच नव्हे, तर त्याने स्वतःही जीव देण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. आंध्र प्रदेशातल्या गुंटूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेची आहे. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
हैदराबादमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या ज्ञानेश्वर नावाच्या तरुणाने आपल्या 20 वर्षांच्या गर्लफ्रेंडचा गळा चिरून तिची हत्या केली. तापसी असं मृत तरुणीचं नाव आहे. ती दंतवैद्यकाचं शिक्षण घेत होती. दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची आरोपी ज्ञानेश्वरशी ओळख झाली. त्यानंतर त्यांचा संपर्क वाढत गेला आणि त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत भांडणं होत होती. त्यानंतर अखेर तापसीने ज्ञानेश्वरशी ब्रेक-अप करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यामुळे तापसी त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली होती, अशी माहिती त्यानेच पोलिस चौकशीत दिली. ज्ञानेश्वरला मात्र आपलं नातं पुन्हा व्यवस्थित व्हावं असं वाटत होतं. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून तापसीने काही महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्या वेळी ज्ञानेश्वरने पोलिसांच्या समोर असं सांगितलं होतं, की तो तिला त्यापुढे त्रास देणार नाही.
गेल्या एक आठवड्यापासून तापसी गुंटूरजवळच्या तक्केल्लापडू येथे आपल्या मैत्रिणीच्या घरी राहिली होती. सोमवारी रात्री (5 डिसेंबर) ज्ञानेश्वरही तिथे पोहोचला. त्याने तिथे गेल्यावर तापसीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर साहजिकच दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. भांडणं सुरू झाल्यानंतर तापसीची मैत्रीण घाबरली आणि तिने मदतीसाठी शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे याचना करायला सुरुवात केली. ती शेजाऱ्यांना बोलवायला गेलेली असताना ज्ञानेश्वरने डाव साधला. त्याने एका सर्जिकल चाकूच्या साह्याने तापसीचा गळा चिरला.
हेही वाचा - एकाच मुलीची दोघांशी ओळख, प्रेमाचा त्रिकोण अनं नागपुरात तरुणावर जीवघेणा हल्ला
ज्ञानेश्वर तेवढ्यावरच थांबला नाही. तो जखमी तापसीला ओढत ओढत खोलीत घेऊन गेला आणि त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर स्थानिक नागरिक तिथे गोळा झाले. त्यांनी दरवाजा तोडला. सगळे जण आपल्याला पकडायला आले आहेत हे पाहून ज्ञानेश्वरने स्वतः जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने चाकूने स्वतःचा हात कापून घेतला. दरम्यानच्या काळात तिथे पोलिस आले आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं.
या दरम्यान तापसीला गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, दुर्दैवाने ती मरण पावली. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boyfriend, Crime news, Girlfriend, Relation