पानीपत, 07 मार्च: देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. दरम्यान काही शाळांनी आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. पण बहुतांशी शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं. असं असलं तरी या विद्यार्थ्यांकडून शाळेची संपूर्ण फी उकळण्याचे प्रयत्न अनेक शाळांनी केले आहेत. अशातचं एक ताजी घटना समोर आली आहे, ज्यामध्ये शाळेची फी न भरल्याने शाळा प्रशासनाने चिमुकल्यांना थेट डांबून ठेवल्याचं समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पानीपत येथील एक खाजगी शाळेनं वार्षिक फी भरली नाही, म्हणून विद्यार्थ्यांना चक्क डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फी उकळण्यासाठी शाळा प्रशासन दंडेलशाहीचा वापर करत आहे. असा आरोप केला जातं आहे, की वार्षिक फी आणि परिवहन शुल्क जमा न केल्यामुळे, शाळा प्रशासनाने काही मुलांना उपाशीपोटी आणि तहानलेल्या अवस्थेत ओलीस ठेवलं आहे. मुलं वेळेवर घरी पोहोचली नाहीत, म्हणून पालकांनी काळजीपोटी शाळेत धाव घेतली, त्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला आहे.
हा धक्कादायक प्रकार समालखा येथील चुलकाना रोडजवळील डीएव्ही सेनेटरी स्कूलमध्ये घडला आहे. येथील मुलं वेळेवर घरी न पोहोचले नाहीत, त्यामुळे संबंधित मुलांचे पालक शाळेत पोहचले. वार्षिक फी आणि वाहतूक शुल्क न भरल्याने मुलांना बंधक बनवून ठेवल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर एका पालकांने उर्वरित पालकांनाही या घटनेची माहिती दिली. शाळेत आलेल्या इतर पालकांनी शाळेच्या आवारात गोधळ घातला, त्यानंतर शाळा प्रशासनाने मुलांना मुक्त केलं आहे. पालकांचं म्हणणं आहे, शाळेची सर्व फी भरल्यानंतरही शाळा प्रशासनाने जवळपास 3 तास मुलांना डांबून ठेवलं आहे.
हे ही वाचा- पुण्यात पालक आक्रमक, फी उकळणाऱ्या शाळांविरोधात ‘नो स्कूल नो फी’ आंदोलन
परिवहन शुल्क आणि वार्षिक फी वसुलीसाठी शाळा पालकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता, त्यांनी या सर्व आरोपाचं खंडन केलं आहे. ते म्हणाले की, आम्ही मुलांना डांबून ठेवलं नाही. एक यादी तयार करून सर्व पालकांना फी जमा करण्याचा संदेश दिला होता. परंतु बहुतांशी पालकांनी फी जमा केली नाही. ज्यामुळे शाळेतील सुमारे 50% विद्यार्थ्यांकडे अद्याप फी बाकी आहे.