जळगाव, 30 ऑगस्ट : पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वादानंतर घटस्फोटाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, पत्नीने घटस्फोट दिल्याचा संतापात थेट पोलिसाच्याच कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली. डायल 112 वर एक कॉल आला होता. त्या कॉलची दखल घेऊन कौटूंबिक न्यायालयात मदतीसाठी गेलेल्या अमलदाराच्याच कानशिलात लगावण्यात आली.
याप्रकरणी याप्रकरणी आतिष दिनेश बारसे व अमित दिनेश बारसे (दोन्ही रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बापुराव पिरा मोरे (वय 46) यांच्या कानशिला लगावली. त्यावरून आज मंगळवारी या दोन्ही भावांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा जिल्हा पेठ पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
बापुराव मोरे जळगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सोमवारी त्यांना डायल 112 या शासकीय पोलीस वाहनावर आरटीपीसी ड्युटी होती. यादरम्यान, सायंकाळी राजेश सुभाष पाटील (रा.कुरंगी, ता.पाचोरा) यांनी डायल 112 वर कॉल आला आणि आम्हाला मारहाण होत असून मदत मागण्यात आली. त्यामुळे मोरे यांनी हवालदार अय्युब पठाण बी.जे.मार्केटमधील कौटूंबिक न्यायालयात गेले. तेथे मोरे यांनी कोणी कॉल केला व काय मदत हवी, अशी विचारणा केली असता राजेश पाटील पुढे आले. त्यांच्यासोबत त्यांची भाची गायत्री मच्छींद्र पाटील, रवींद्र भिका पाटील, बहिण दीपाली मच्छींद्र पाटील (सर्व रा.विखरण, ता.एरंडोल) असे होते.
राजेश पाटलांनी यावेळी दिली ही माहिती -
गायत्री हिचा आज न्यायालयात पती आतिष बारसे याच्यासोबत घटस्फोट झाला. त्यामुळे चिडून आतिष हा बहिण दिपाली हिच्या अंगावर धावून आला तर चुलत मेहुणे रवींद्र पाटील यांनाही त्याने मारहाण केली. तसेच तुम्ही खाली या, पाहतोच अशी धमकी दिली, असे राजेश पाटील यांनी पोलिसांना सांगितले. त्यावर मोरे यांनी तुम्हाला पोलिसात तक्रार द्यायची आहे का? असे विचारले. तसेच तक्रार द्यायची नसेल तर खाली सोडतो, असे सांगितले.
यावर राजेश पाटील यांनी तक्रार द्यायची तयारी दर्शवली. त्यामुळे मोरे यांनी या सर्वांना पोलीस वाहनात बसविल्यावर आतिष याने उजव्या बाजुचा दरवाजा जोरात उघडला आणि गायत्री पाटीलला हात धरुन बाहेर ओढले. याप्रकारावर मोरे यांनी सरकारी वाहनाचा दरवाजा का उघडला, असा जाब त्याला विचारला. त्यावर त्याने थेट बापुराव मोरे यांच्या कानशिला लगावली आणि गायत्री हिच्या अंगावर धावून गेला. इतकेच नव्हे तर त्याच्या भावानेही पोलिसांशी धक्काबुक्की केली.
हेही वाचा - हातापायाला काळा दोरा, शेजारी दूधाची बाटली अन्..; जळगावात रेल्वे ट्रॅकजवळ भयानक अवस्थेत आढळलं बाळ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.