अमरावती, 24 मार्च : आंध्र प्रदेशातील कडप्पा शहरातील पोलिसांना 2020 मध्ये झालेल्या हिरे चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात यश आलंय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी इस्माईल शाहिद हुसेन (रा.मुरुडेश्वर, जि.उत्तरा कन्नड, कर्नाटक) याच्यासह अन्य एका आरोपीला कडप्पा येथील जीत पंजाबी ढाब्याजवळ 8 मार्च 2023 रोजी अटक केली. आरोपींनी चोरीचे हिरे कर्नाटक राज्यातील विविध ठिकाणी ज्वेलर्स आणि दागिन्यांच्या दुकानात विकण्याचा प्रयत्न केला होता, असंही पोलीस तपासात पुढं आलंय.
पोलीस अधीक्षक केकेएन अनबुराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कडप्पा शहरातील अलमासपेट येथील पठाण खादर बाशा यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडील 8 हिरे लुटले होते. 16 जानेवारी 2020 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी खादर बाशा यांचा मुलगा आसिफ खान याने दिलेल्या तक्रारीवरून 2020 मध्येच पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली होती. आरोपींनी हिरे चोरल्यानंतर ते ज्या गाडीमध्ये गेले होते, ती गाडी नेमकी कोणती होती, हे पोलिसांना तपासात समजलं. त्यानंतर पोलिसांनी मुंबई, अहमदाबाद, सुरत, गोवा आणि इतर ठिकाणी जाऊन संबंधित गाडीचा शोध घेतला होता. अखेर पोलिसांना या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यश आलंय. तसंच आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन हिरे आणि एक पिवळा नीलम गोव्यातील मापुसा येथून जप्त केलाय.
लॉरेन्स बिश्नोई ते हाशिम बाबा 'हे' आहेत भारतातील टॉप 10 गँगस्टर
नेमकं काय झालं होतं?
या प्रकरणातील मुख्य आरोपी इस्माईल शाहिद हुसेन हा गोवा येथे वास्तव्यास असतो. तो खादर बाशा यांच्या ओळखीचा होता. बाशा यांनी हुसेनला विक्रीसाठी ठेवलेले तब्बल नऊ हिरे दाखवले होते. तेव्हा हुसेन याने हिरे चोरण्याचा इरादा पक्का केला. त्यानुसार त्याने हिरे चोरण्याच्या उद्देशानं गुजरातच्या घनश्याम शेषभाई आणि इम्रान यांच्यासोबतच कर्नाटकातील इनामुल्ला नावाच्या आणखी एका व्यक्तीसह 16 जानेवारी 2020 रोजी कडप्पा गाठलं, व रिम्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदित्य लॉजमध्ये भाडोत्री रुम घेतली. त्याच दिवशी मुंबईतील एक हिरे व्यापारी चांगल्या किंमतीत हिरे खरेदी करण्यासाठी कडप्पा येथे आला असल्याच्या बहाण्यानं आरोपी हुसेन याने खादर बाशा यांना लॉजवर बोलावलं.
हुसेन हा ओळखीचा असल्यानं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बाशा हे 8 छोटे हिरे घेऊन लॉजवर गेले. तेथे हुसेन याने त्याच्यासोबत असणाऱ्या साथीदारांची व्यापारी म्हणून ओळख करून दिली, व बाशा यांना हिरे दाखवण्यास सांगितलं. त्यानंतर बाशा यांनी हिरे दाखवताच हुसेन व त्याच्यासोबतच्या साथीदारांनी बाशा यांच्यावर हल्ला केला, व त्यांना बाथरूममध्ये बांधून त्यांच्याकडील हिरे घेऊन हुसेन व त्याचे साथीदार पसार झाले. बाशा यांचा आरडाओरडा ऐकून लॉजच्या कर्मचाऱ्यांनी रुममध्ये जाऊन बाथरूममध्ये बांधलेल्या बाशा यांची सुटका केली होती. या प्रकरणी बाशा यांचा मुलगा आसिफ खान याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime