मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

New Delhi Murder Case : मालिका बघून सूचली खूनाची कल्पना, कुटुंबीयांनी मृत समजून अंत्यसंस्कार केले, अन् घडलं भलतंच

New Delhi Murder Case : मालिका बघून सूचली खूनाची कल्पना, कुटुंबीयांनी मृत समजून अंत्यसंस्कार केले, अन् घडलं भलतंच

मालिका बघून सूचली खूनाची कल्पना, कुटुंबीयांनी मृत समजून अंत्यसंस्कार केले तिलाच जिवंत पाहून पोलीसही चक्रावले

मालिका बघून सूचली खूनाची कल्पना, कुटुंबीयांनी मृत समजून अंत्यसंस्कार केले तिलाच जिवंत पाहून पोलीसही चक्रावले

दिल्लीत खुनाच्या गंभीर घटना उघडकीस येत आहेत. भयानक कट रचून खून केले जातात, त्याचा घटनाक्रम वाचून आपलाही थरकाप उडतो.

  • Local18
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : मागच्या काही दिवसांपासून खुनाच्या गंभीर घटना उघडकीस येत आहेत. भयानक कट रचून खून केले जातात, त्याचा घटनाक्रम वाचून आपलाही थरकाप उडतो. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी ग्रेटर नोएडामध्ये घडली होती. इथं एका गावात एका 21 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. पण या प्रकरणात एक ट्विस्ट आला आणि त्या मागची धक्कादायक कहाणी ऐकून पोलीसही चक्रावले. पाहूयात नेमकं काय घडलं होतं. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.

13 नोव्हेंबर 2022, ग्रेटर नोएडा

बिसरख पोलीस स्टेशन हद्दीतील बदपुरा गावात राहणाऱ्या एका कुटुंबासाठी 13 नोव्हेंबरची सकाळ वाईट होती. त्यांच्या पायल नावाच्या मुलीचा जळालेला मृतदेह खोलीत पडून होता. मृतदेहाचा चेहरा एवढा जळाला होता की, कुटुंबीयांना ओळखणंही कठीण झालं होतं. पण, मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आणि त्यावरील कपडे पाहता तो मृतदेह पायलचा असल्याची खात्री पटली. पायलने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं. घरच्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती न देताच मुलीचे अंत्यसंस्कार केले आणि काहीच झालं नसल्यासारखे वागू लागले.

हे ही वाचा : वाईट हेतूने घरी यायचा, पती-पत्नीने केला विरोध; भररस्त्यावर महिलेसोबत भयानक कृत्य

15 नोव्हेंबर 2022

या घटनेनंतर दोन दिवसांनी एका महिलेने बिसरख पोलीस ठाण्यात तिची 28 वर्षांची बहीण हेमा हरवल्याची तक्रार नोंदवली. महिलेने सांगितले की, तिच्या बहिणीचा मोबाईल दोन दिवसांपूर्वी बंद झाला असून, ती सापडत नाहीये. पोलिसांनी रिपोर्ट लिहिला आणि या प्रकरणाचा तपास करण्याच्या उद्देशाने हेमाच्या मोबाईल फोनचा सीडीआर काढला. सीडीआर काढताच पोलिसांना या प्रकरणाचा पहिला क्लू मिळाला. त्यानंतर अजय कुमार पोलिसांच्या रडारवर आला.

1 डिसेंबर 2022

आता पोलिसांनी अजयच्या अटकेसाठी सापळा रचला आणि ग्रेटर नोएडातील चार मूर्ती सर्कल इथून त्याला गर्लफ्रेंडसह पकडलं. पण या दोघांच्या अटकेने पायलच्या आत्महत्येची कहाणी 360 डिग्री पलटली. कारण अजयसह पोलिसांनी ज्या तरुणीला अटक केली ती दुसरी कोणी नसून, पायल होती. होय, तीच पायल. जिने 13 नोव्हेंबरला आत्महत्या केली होती.

पण हे कसं शक्य आहे? ज्या मुलीने 15 दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती, जिच्यावर कुटुंबीयांनी स्वतःच्या हाताने अंत्यसंस्कार केले होते, ती जिवंत कशी असेल? पण खरी कहाणी बाहेर आल्यावर इतरांसह पोलीसही चक्रावले.

मेली ती पायल नव्हे तर हेमा होती

13 नोव्हेंबर 2022 रोजी ज्या मुलीचा मृतदेह सापडला होता, तो पायलचा नसून, हेमाचा होता. तिच्या बहिणीने बिसरख पोलीस ठाण्यात जाऊन हरवल्याची तक्रार दाखल केली होती. हेमाने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करून तिचा मृतदेह जाळण्यात आला होता. एवढंच नाही तर मृतदेहाजवळ पायलच्या नावाने सुसाईड नोटही ठेवण्यात आली होती, जेणेकरून मृतदेह पायलचा असल्याची खात्री होईल.

सुसाईड नोट खोटी होती

"माझा चेहरा खूप जळाला होता आणि मला या जळलेल्या चेहऱ्यासोबत जगायचं नाही, म्हणून मी आत्महत्या करत आहे," असं सुसाईड नोटमध्ये पायल भाटीने लिहिलं होतं.

पायल आणि अजयने रचला होता कट

हेमाची हत्या पायल आणि तिचा बॉयफ्रेंड अजयने केली होती. या दोघांनीही हेमाला 5 हजार रुपयांचे आमिष दाखवून किडनॅप केलं. त्यानंतर तिला आपल्या घरी आणून तिची हत्या केली. असं करून आरोपींना पायलला मृत दाखवायचं होतं. तसंच आणखी खून करण्याचाही त्यांचा प्लॅन होता.

म्हणून पायलने रचला भयंकर कट

पायल आणि अजयने हे का केलं, हा सर्वांत मोठा प्रश्न होता. तर झालं असं होतं की याच वर्षी मे महिन्यात पायलच्या आई-वडिलांनी आत्महत्या केली होती. पायलने तिचा चुलत भाऊ सुनील, त्याची पत्नी स्वाती आणि तिच्या काही नातेवाईकांना पैशाच्या व्यवहारातून तिच्या आई-वडिलांच्या मृत्युसाठी जबाबदार धरलं. त्यामुळे तिला बदला घ्यायचा होता. पण त्यांना मारण्याआधी तिच्यावर कुणाला संशय येऊ नये म्हणून तिला मेल्याचं नाटक करायचं होतं. याचाच भाग म्हणून तिने बॉयफ्रेंडसोबत स्वतःच्याच मृत्यूचं नाटक केलं आणि निष्पाप हेमाचा खून केला.

12 नोव्हेंबरच्या रात्री केला खून

12 नोव्हेंबरच्या रात्री दोघांनी हेमाचा चाकूने वार करून खून केला आणि नंतर उकळत्या तेलाने तिचा चेहरा जाळला. दोघांनी तिला पायलचे कपडे घातले, पायलने स्वतःच्या नावाने एक खोटी सुसाईड नोट लिहिली आणि हे सर्व स्वतःच्या घरी सोडून पायल तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली.

मालिका बघून मिळाली खूनाची आयडिया

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलला 'कुबूल है' नावाची मालिका पाहून खूनाची कल्पना सुचली आणि तिने अजयसमोर अट ठेवली. जर त्याने तिच्या आई-वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तिला मदत केली तरच ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर अजयसोबत तिने सुनील आणि इतर लोकांना मारण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, पण त्यात यश मिळालं नाही आणि याचदरम्यान ती तिच्या बॉयफ्रेंडसह पोलिसांच्या तावडीत सापडली आणि तिचं पितळ उघडं पडलं.

पायलच्या आजोबांनी दिली महत्त्वाची माहिती

पायलचा पर्दाफाश झाल्यानंतर तिचे आजोबा ब्रह्मसिंह यांनी पोलिसांना सांगितलं की, तिला अजयशी लग्न करायचं होतं. घरातील लोक हे लग्न होऊ देणार नाहीत, अशी भीती तिला वाटत होती. या भीतीपोटी तिने हा सगळा कट रचला. जेणेकरून सर्वांना ती मेली आहे, असं वाटेल आणि ती अजयसोबत आरामात राहील.

First published:

Tags: Crime news, Delhi, Delhi Police