नवी दिल्ली,18 डिसेंबर: सोशल मीडियावरची खोटी प्रोफाइल, खोटे फोन कॉल आणि एसएमएसना बळी पडू नका अशी जाहिरात बँका, सरकारी यंत्रणा, पोलीस वारंवार करत असतात. अनेक जण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांची फसवणूक करून घेतात. नवी दिल्लीतील पुप्ष विहार भागात राहणाऱ्या एका ब्युटिशियन महिलेला तिच्या इन्स्टाग्रामवरील तथाकथित ब्रिटिश भावाने 4 लाखांचा गंडा घातला आहे. जेव्हा तिच्याकडचे पैसे संपले तेव्हा तिच्या ध्यानात आलं की आपली फसवणूक झाली आहे आणि मग तिने साकेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने तपास करत अमरजित यादव (रा. जनकपुरी, दिल्ली) आणि नायजेरियाचा नागरिक बेंजामिन एकेने याला ताब्यात घेतलं आहे अशी माहिती दक्षिण दिल्लीचे डीसीपी अतुल ठाकूर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही महिला ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. सप्टेंबर महिन्यात लॉकडाउनच्या काळात ही महिला Luccy Hairry या नावाच्या इन्स्टाग्रमावरील प्रोफाइलच्या संपर्कात आली. त्यानी आपण ब्रिटिश असल्याचं महिलेला सांगितलं. जवळीक वाढल्यावर मी तुझा भाऊ आहे असं तो आरोपी महिलेला म्हणायचा. एक दिवस त्यानी सांगितलं की त्यानी एक मौल्यवान भेट तिला पाठवली आहे. त्या गिफ्ट पार्सलमध्ये परदेशी चलनी नोटा आहेत. त्यानंतर तक्रारदार महिलेले कस्टम्स ऑफिसर आणि एक्साइज ऑफिसर्सच्या नावाने वेगेवेगळे फोन आले आणि कर भरून भेट घेऊन जायला सांगितलं. त्यांनी कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी, परदेशी चलन कन्व्हर्जनची फी आणि लाच यासाठी अनुक्रमे 25 हजार रुपये, 91 हजार 500 रुपये, 2 लाख 1 हजार 500 रुपये आणि 75 हजार रुपये भरायला सांगितले. त्यानंतरही त्यांनी पावणे चार लाखांची मागणी केल्यानंतर महिलेला तिची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि तिनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
हे वाचा-धक्कादायक! पत्नीची हत्या करुन माजी पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या
तपासाबाबत ठाकूर म्हणाले, ‘ महिलेनी पैसे भरले ते नागालँडमधल्या दिमापूरच्या युनियन बँकेतलं खातं आहे हे तपासात आमच्या लक्षात आलं. तिला फोन केले गेलेले नंबर स्फूफ केले होते. दिमापूर पोलिसांनी बँक खात्याचा पत्ता तपसला तर तो खोटा निघाला. त्यामुळे आमच्याकडे पुरावेच उपलब्ध नव्हते. नंतर आम्ही इन्स्टाग्रामला नोटीस पाठवून त्या खात्याची माहिती मागवली आणि बँकेनेही माहिती दिली. टेक्निकल विश्लेषण करून आम्ही अमरजित यादव आणि बेंजामिन एकेने यांना ताब्यात घेतलं. अमरजित सहा महिने सिम कार्ड डिलर म्हणून काम करत होता त्याला बेंजामिननी लवकर पैसा कमवण्याचं आमिष दाखवून या प्रकरणात घेतलं. चोरीचे पैसे ज्या बँक खात्यांत भरले गेले ते खोटं खातं उघडून देण्याचं काम अमरजितनी केलं. त्यानंतर ते पैसे एटीएममधून काढून त्यातील वाटा तो एकेनेला देत होता. आणखी एक परदेशी नागरिक जोसेफ आणि भारतीय प्रभू असे दोन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. ’