ब्यूनस आयर्स, 28 जुलै : आजकाल जागतिक स्तरावर बाजारांमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या रुपात अब्जावधी रुपयांचे व्यवहार सुरू आहेत. यामुळे क्रिप्टोबाबत चांगलं ज्ञान असलेली कोणतीही व्यक्ती क्षणात लखपती होत आहे. मात्र हीच बाब एखाद्याच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडवून आणू शकते. अर्जेंटिनाच्या एका क्रिप्टो लखपतीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. फर्नांडो पेरेझ अल्गाबा असं या व्यक्तीचं नाव आहे. क्रिप्टो इन्फ्लुएन्सर असलेला फर्नांडो गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होता. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एल पेसने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी ब्यूनस आयर्समधील इंजेनिएरोमध्ये एका ओढ्याजवळ खेळणाऱ्या मुलांना एक लाल सुटकेस सापडली. ही मानवी अवशेषांनी भरलेली होती. मात्र मुलांनी पालकांनी ती उघडली नाही, तर त्याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुटकेस उघडताच सर्वांना धक्का बसला. सुटकेसमध्ये मानवी हात आणि पाय होता. तर, आजूबाजूला शोध घेतल्यानंतर ओढ्यात एक हात सापडला. काहीवेळाने पोलिसांना डोकं आणि धडही सापडलं. हे अवयव अतिशय सराईतपणे कापण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीने हे कृत्य केलं असण्याची शक्यता आहे.
बोटांचे ठसे आणि टॅटूच्या आधारे पोलिसांनी हे अवयव फर्नांडो पेरेझ अल्गाबाच्या शरीराचे असल्याचं ओळखलं. अल्गाबा गेल्या मंगळवारपासून बेपत्ता होता. शवविच्छेदनात असं दिसून आलं की, त्याला सुटकेसमध्ये ठेवण्यापूर्वी तीन गोळ्या घालण्यात आल्या होत्या. सीमा हैदरवर संशय बळावला, ‘कराची कनेक्शनचा’ तपास सुरू 41 वर्षांचा फर्नांडो मित्रांमध्ये लेचुगा (लेट्यूस) या नावाने प्रसिद्ध होता. तो एक उद्योजक होता. त्याने वयाच्या 14व्या वर्षी पिझ्झा डिलिव्हरी मॅन म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यानं सँडविचदेखील विकले होते. त्यानंतर वाहनांची दुरुस्ती आणि पुनर्विक्रीचं काम सुरू केलं. आलिशान वाहनं भाड्याने देऊन आणि क्रिप्टोकरन्सी विकून त्याने लाखो रुपयांची संपत्ती जमा केली. इन्स्टाग्रामवर त्याचे सुमारे 900,000 फॉलोअर्स होते. मिळालेल्या माहितीनुसार, फर्नांडो स्पेनमध्ये स्थायिक झाला होता. मात्र कथित हत्येच्या एका आठवड्याआधी तो अर्जेंटिनामध्ये आला होता. त्याला 19 जुलै रोजी त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटच्या चाव्या मालकाकडे परत करायच्या होत्या. मालमत्ता मालकाने दिलेल्या जबाबानुसार, तो चाव्या देण्यासाठी आलाच नाही आणि त्याने फोनही उचलला नाही. यानंतर तो बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली. 2019 मध्ये, अल्गाबाची कंपनी ‘Motors Lettuce SRL’चे चेक बाउन्स व्हायला सुरुवात झाली होती. परिणामी त्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी जमा झाली होती. La Naciónच्या वृत्तानुसार, अल्गाबाने क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून भरपूर पैसे गमवले होते. असा दावा करण्यात आला आहे की, त्याच्या फोनमध्ये एक नोट सापडली आहे. अल्गाबाला 40 हजार डॉलर्सची रक्कम बारा ब्रावा नावाच्या टोळीला देणं होतं. ‘मला काही झालं तर मी सर्वांना आधीच सावध केलं आहे’, असा मेसेज त्याच्या फोनमध्ये सापडला आहे.