वैजापूर, 7 मे: मागील काही दिवसांपासून कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलांसोबत अश्लील चाळे (molestation in covid center) केल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना औरंगाबादच्या वैजापूर येथील एका कोविड सेंटरमध्ये घडली आहे. येथील एका खाजगी रुग्णवाहिका चालकानं (Private ambulance driver) कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छेडछाड केल्यानंतर पळून जाताना आरोपीला कर्मचाऱ्यांनी पकडलं असून याबाबतची माहिती पोलिसांना दिली. रुद्र पाटील मावळे असं संबंधित आरोपी रुग्णवाहिका चालकाचं नाव असून तो वैजापूर तालुक्यातील डाक पिंपळगाव येथील रहिवासी आहे. वैजापूर शहरानजीक गायकवाडवाडी याठिकाणी निवासी शाळेत शासकीय कोव्हिड सेंटर उभारण्यात आलं आहे. याठिकाणी सध्या 150 हून अधिक रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. येथील रुग्णवाहिका चालक आणि आरोपी रुद्र पाटील मावळे यालाही काही दिवसांपूर्वी कोव्हिडची बाधा झाली. त्यामुळे त्यालाही याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. बुधवारी (5 मे) रात्री नऊच्या सुमारास कोव्हिड सेंटरची इमारत क्रमांक दोनमधून ओरडण्याचा आवाज आला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी रुद्र हा संबंधित महिलेच्या बेडवर बसल्यानं त्यांच्यात वाद सुरू होता. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुद्र याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने त्यांचं काहीही न ऐकता उलट त्यांनाच शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून पळ काढला. हे वाचा- बीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO यावेळी पोलीस मित्र आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान या घटनेनंतर रुग्णालयात बराच गोंधळ उडाला होता. कोव्हिड सेंटरमध्ये जर असे प्रकार घडणार असतील तर आम्ही घरीच उपचार घेतो, असा पवित्राही काही रुग्णांनी घेतला होता. पण वैजापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. संबंधित रुग्णाची समजूत काढल्यानंतर कोव्हिड सेंटरमधील तणाव निवळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.