पटना 28 मार्च : मध्य प्रदेशमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एकाच नवरीसोबत लग्न (Marriage) करण्यासाठी सहा वेगवेगळे नवरदेव तिच्या घरी पोहोचले. मात्र, घरी पोहोचले तेव्हा ना सासरची मंडळी दिसली, ना लग्न लावणारे आणि ना नवरीबाई. यानंतर हे सगळे आपली तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. कोलार पोलिसांनी लग्न जमवणाऱ्या संस्थेवर फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्वांकडून लग्नासाठी वीस - वीस हजार रुपये जमा केले गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील शगुन जन कल्याण सेवा समिती नावाची संख्या लोकांचं लग्न जमवण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणुक करते. याच समितीनं सात नवरदेवांचं 25 मार्चला लग्न लावून देण्याचं सांगितलं. ही संस्था गरीब मुलींचं लग्न लावण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक करत होती. ही संस्था मुलाच्या घरच्यांकडून वीस हजार रुपये घ्यायची. मुलीच्या घरच्यांना मुलगाही दाखवला जातो. मात्र, जेव्हा लग्नाची बोलणी सुरू होताच मुलाच्या घरच्यांनी नकार दिल्याचं मुलाकडच्या लोकांनी नकार दिल्याचं ही संस्था मुलीच्या कुटुंबीयांना सांगत असे. याच सर्व घोटाळ्यादरम्यान सात नवरदेव वरात घेऊन दिलेल्या तारखेला पोहोचले. मात्र, तिथे कोणीच नव्हतं. सगळेच गायब होते, इतकंच नाही तर सासुरवाडीच्या घरालाही कुलूप लावल्याचं त्यांना पाहायला मिळालं. सर्वांनी संस्थेला आणि लग्न जमलेल्या मुलीच्या घरच्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणाचाच फोन लागला नाही. यानंतर या सर्वांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाबद्दल बोलताना पीडित केशवनं सांगितलं, की सगळ्यात आधी त्यांना एका बस स्टॅण्डवर एक कागद मिळाला. यावरील नंबरवर फोन केला असता रोशनी तिवारी नावाची एक महिला त्यांच्यासोबत बोलली. यानंतर केशवला ऑफिसमध्ये बोलावलं गेलं. केशवनं सांगितलं, की 16 जानेवारीला दुपारी जेव्हा तो ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा त्याला एक 25 वर्षीय तरुणी दाखवली गेली. यानंतर हे लग्न ठरलं. रोशनीनं ही तरुणी आपली मुलगी असल्याचं सांगितलं. या समितीनं लग्न करुन देण्याच्या नावानं वीस हजार रुपये घेतले. जेव्हा लग्नासाठी तो ठरलेल्या पत्त्यावर पोहोचला तेव्हा तिथे कुलूप लावलेलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप तिवारी आणि त्याची पत्नी रोशनी तिवारी शगुन जन कल्याण नावानं एक समिती चालवतात. त्यांच्यासोबत असणारा रिंकू सेन स्वतःला या समितीचा कर्मचारी असल्याचं सांगतो. रोशनी तिवारी मुलींची आई असल्याचं सांगत लोकांकडून पैसे उकळते. आता या फसवणुकीविरोधात तक्रार दाखल झाली असून पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.