लखनऊ 12 फेब्रुवारी : लखनऊच्या डॉ. शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वास विश्वविद्यालयात बीएच्या (BA) पहिल्या वर्षात शिकणाऱ्या दिव्यांग मुलासोबत रॅगिंग (Ragging) केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याचा आरोप आहे, की सिगरेट (Cigarette) पिण्यास नकार दिल्यानंतर वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्याला मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम वर्षात शिकणारा हा विद्यार्थी विद्यालयाच्या परिसरातील एका वसतिगृहात राहातो.
या विद्यार्थ्याचा असा आरोप आहे, की रात्रीच्या वेळी तो खानावळीमध्ये जेवण करत होता. याच दरम्यान बीएड प्रथम वर्षाचा विद्यार्थी आकाश यादव आणि एमएड तृतीय सेमिस्टरचा विद्यार्थी सत्येंद्र यादव तिथं पोहोचले आणि दिव्यांग विद्यार्थ्याला पडकलं. यानंतर दोघेही त्याला एका रूममध्ये घेऊन गेले.
पीडिताच्या म्हणण्यानुसार, दोन्ही विद्यार्थ्यांनी त्याला सिगरेट पिण्यास सांगितलं. मात्र, त्यानं नकार दिल्यानंतर जळती सिगरेट त्याच्या तोंडामध्ये टाकली. यानंतर दोघांनीही मिळून त्याला मारहाण केली. यानंतर त्याचे कपडे फाडले. यादरम्यान पीडित जोरजोरानं ओरडत राहिला, मात्र कोणीही त्याचा आवाज ऐकला नाही. याप्रकरणी पीडितानं विश्वविद्यालय प्रशासनाकडे तक्रार केली. तपासादरम्यान घटनेची सत्यता समोर आली. यानंतर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून शोध सुरू आहे.
पनर्वास विश्वविद्यालयाचे रजिस्ट्रार अमित कुमार सिंह यांनी या घटनेची माहिती देताना म्हटलं, की हे प्रकरण अॅन्टी रॅगिंग सेलकडे ट्रान्सफर केलं गेलं आहे. याठिकाणी विद्यार्थ्याचं मेडिकल केलं गेलं होतं. त्याला विश्वविद्यालयात कोणत्याही प्रकारची अडचण इथून पुढे येणार नाही. त्यानं केलेली तक्रार खरी असल्यास दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल. अशा प्रकारचं कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.