गुरुग्राम, 16 फेब्रुवारी : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासल्याच्या धक्कादायक प्रकार हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथून समोर आला आहे. एका व्यक्तीनं मित्राचं मोबाईल सिम कार्ड स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकून पेटीएम वापरत मित्राच्या बँक अकाउंटमधून वेळोवेळी पैसे काढत तब्बल 1 लाख 36 हजार रुपयांचा मित्राला चुना लावला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. ताराचंद असं आरोपीचं नाव आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.
ताराचंद व रामफळ यादव हे दोघे चांगले मित्र होते. बँक अकाउंटमधून पैसे कमी होत असल्याचं लक्षात येताच रामफळ यादव यांनी 3 जानेवारी 2023 रोजी मानेसरमधील सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणूक आणि आयटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता. तक्रारीमध्ये यादव यांनी म्हटले होतं की, ‘मी कधीही ऑनलाइन बँकिंगची सुविधा घेतली नाही. मी स्मार्टफोनही वापरत नाही. त्यानंतरही माझ्या बँक अकाउंटमधून पैसे कमी होत आहेत.’
पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती -
या प्रकरणाचं गांर्भीय लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला. बँकेला नोटीस देऊन अकाउंटचा तपशील मागवला. तेव्हा ही सर्व रक्कम पेटीएम अकाउंटमधून ट्रान्सफर झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी पेटीएम कंपनीशी संपर्क केला, तेव्हा कळलं की संबंधित पेटीएम अकाउंट रामफळ यादव यांच्याच नावानं रजिस्ट्रर्ड आहे. ज्यामध्ये यादव यांचा नंबर आणि अकाउंट डिटेल्स टाकण्यात आलेत. तपासादरम्यान असं आढळून आलं की, सुमारे 3 महिन्यांत कधी 5 हजार तर कधी 7 हजार रुपये या अकाउंटमधून काढण्यात आलेत. त्यामुळे पोलिसांनी यादव यांना विचारलं की, ‘तुम्ही तुमचं डेबिट कार्ड किंवा मोबाईल सिम कार्ड कोणाला दिलं आहे का?’ तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला होता. पण पोलीस तपासात अखेर धक्कादायक सत्य समोर आलं.
असा पकडला आरोपी
पोलिसांना माहिती मिळाली की, यादव हे त्यांचा मित्र ताराचंदसोबत बसून दारू पितात. तसंच ताराचंदच्या मोबाईलवर पेटीएम अकाउंट असून, ते यादव यांच्या नावावर असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच ताराचंद याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी ताराचंदला अटक केली होती.
हेही वाचा - स्वस्तात दुचाकीचे आमिष दाखवून 20 लाखांचा गंडा, भंडाऱ्यातील घटनेने खळबळ
असा केला गुन्हा
ताराचंद याने त्याचा मित्र रामफळ यादव यांना दारू पाजून त्यांच्या मोबाईलमधील सिम काढून ते स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकले. सुरुवातीला त्यानं यादव यांच्या सिम नंबरवरून स्वतःच्या मोबाईलमध्ये पेटीएम अकाउंट रजिस्टर केलं. तसंच त्यामध्ये यादव वापरत असलेल्या डेबिट कार्डचा तपशील भरून पेटीएम अकाउंट सुरू केलं. त्यानंतर पेटीएम वापरून तो व्यवहार करू लागला, व 3 महिन्यांत यादव यांच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटमधून 1 लाख 36 हजार रुपये ट्रान्सफर केले. विशेष म्हणजे पैसे ट्रान्सफर करताना यादव यांचे सीम कार्ड ताराचंदच्या मोबाईलमध्ये असायचं. त्यामुळे अकाउंटमधून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज यादव यांच्या मोबाईलवर आला नाही.
दरम्यान, सायबर गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीनं स्वतःचे बँक अकाउंट डिटेल, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Financial fraud, Haryana, Money fraud, Online fraud, Paytm