Online Task Game साठी महिलेवर चाकूने हल्ला करुन मुलगा फरार, चॅटमुळं उघड झालं प्रकरण

Online Task Game साठी महिलेवर चाकूने हल्ला करुन मुलगा फरार, चॅटमुळं उघड झालं प्रकरण

नेहरू कॉलनीत एका मुलानं महिलेवर हातोडा आणि चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं आहे. सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण ऑनलाईन टास्क गेमशी (Online Task Game) संबंधित असल्याचं आढळलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : मोबाईलवर मुलांसाठी ऑनलाईन गेम (Online Game) किती धोकादायक असू शकतात याचा प्रत्यय देहरादूनच्या एका घटनेमुळे आला आहे. नेहरू कॉलनीत एका मुलानं महिलेवर हातोडा आणि चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं आहे. सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण ऑनलाईन टास्क गेमशी (Online Task Game) संबंधित असल्याचं आढळलं आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या ऑनलाईन गेमिंग चॅटच्या (Chating) आधारे असं सांगितलं जात आहे,  की मुलानं टास्क पूर्ण करण्यासाठी हे कृत्य केलं आहे.

घटना गुरुवारी रात्रीची असून स्वर्ण गंगा एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या ज्योती नेगी यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. त्यावेळी ज्योती कॉलनीच्या रस्त्यावर फिरत होत्या. त्यांचे पती सिद्धार्थ आहलुवालिया सुमारे 100 मीटर अंतरावर एका दुकानात दूध घेण्यासाठी गेले होते. नेहरू कॉलनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सिद्धार्थ म्हणाले की, अज्ञात व्यक्तीनं ज्योतीवर हातोडा आणि चाकूनं हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून प्रोजेक्ट फाईल, हातोडा आणि भाजी कापण्याचा चाकू जप्त करण्यात आला आहे.

आज तकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. ज्योतिनं या हल्ल्याबद्दल बोलताना सांगितलं, की व्यक्तीनं तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस वार केला. नंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी एका बेपत्ता मुलाचा फोटो दाखवून महिलेला ओळख पटवण्यास सांगितली, तेव्हा हा तोच मुलगा असल्याचं महिलेनं सांगितलं. पोलिसांनी ज्या मुलाचा फोटो महिलेला दाखवला तो या घटनेनंतर फरार झाला आहे. घटनास्थळी याच मुलाची एक प्रोजेक्ट फाईलही मिळाली आहे.

पोलिसांनी सांगितलं, की संबंधित मुलगा सध्या फरार असून त्याचा तपास सुरू आहे. या ऑनलाईन गेममध्ये आणखी कोण जोडलं गेलं होतं, याचा तपास करणं गरजेचं असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे, की हा मुलगा आपल्याच घरातील सदस्यांचा आणि मित्रांचा मोबाईल वापरत होता. त्यावर मिळालेल्या ऑनलाईन गेम चॅटमधून समोर आलं आहे, की त्यानं टास्क पूर्ण करण्यासाठी हे कृत्य केलं आहे. मुलानं हे सर्व कोणाच्या सांगण्यावरुन केलं, याच उत्तर त्याचा पत्ता लागल्यावरच मिळणार आहे.

Published by: Kiran Pharate
First published: February 27, 2021, 11:36 AM IST

ताज्या बातम्या