• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • गरिबीमुळे भीक मागणाऱ्या बेपत्ता मुलींचा शोध, पोलिसांनी टाकला अपहरण नाट्यावर पडदा

गरिबीमुळे भीक मागणाऱ्या बेपत्ता मुलींचा शोध, पोलिसांनी टाकला अपहरण नाट्यावर पडदा

मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

  • Share this:
भिवंडी, 26 ऑक्टोबर : घरातून निघून जात भीक मागत फिरत असणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचा शहर पोलिसांनी शोध घेत त्यांच्या हरवल्या असल्याबाबतच्या तक्रारीची यशस्वी उकल केली आहे. भिवंडी शहरातील नवीबस्ती पाईप लाईन येथील तीन अल्पवयीन मुली हरविल्या असल्याची तक्रार मुलींची आई साबेरा रफिक महंमद शेख यांनी शहर पोलीस  ठाण्यात केली होती. मिसबाह (वय 13) शबनम (वय 12) ,व रौशन (वय 10) या तीन मुली हरवल्याबाबत 17 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली असता मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे , सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गावित ,वपोनि सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा तपास कामी लागली, स पो निरी जमीर शेख , पो उपनिरी हनिफ शेख यांच्या नेतृत्वा खालील दोन पथके तयार करून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा भिवंडीसह संपूर्ण आसपासच्या परिसरात शोध सुरू करण्यात आला. पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शहरातील ठाणे रोड या ठिकाणावरील हिंदुस्थान मस्जिद जवळ एक 10 वर्षाची चिमुरडी भीक मागत असताना आढळून आली. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता तिने आपले नाव रौशन असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिच्याकडे तिच्या दोन बहिणींबाबत विचारपूस करीत त्या जिथं आहेत तिथं घेऊन जाण्याबाबत सांगितले. त्यानंतर मिसबाह , शबनम या दोघीही समरू बाग तलाव परिसरात भीक मागत असताना आढळून आल्या.  या तिघींना ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली असता वडील अपंग असल्याने व दारिद्र्याला वैतागून आपण स्वतःहून भीक मागण्याच्या उद्देशाने घर सोडल्याचे सांगितले. शहर पोलिसांनी या तिघी अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करत या अपहरण नाट्यावर पडदा टाकण्यात शहर पोलिसांना यश आलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published: