उदय तिमांडे, प्रतिनिधी
नागपूर, 25 मार्च : जगात तरुणाईचा देश म्हणून भारताची ओळख आहे. पण, या तरुणांच्या देशात सध्या बेरोजगारी ही मोठी समस्या झाली आहे. याच बेरोजगारीचा फायदा घेत सायबर गुन्हेगार मालमाल होत असल्याचं समोर आलं आहे. अनेक तरुण नोकरीच्या शोधात सोशल मीडियावर किंवा काही वेबसाईटवर त्यांचा बायोडाटा अपलोड करतात. पण, त्यांचा हाच बायोडाटा आणि मोबाईल नंबर, सायबर गुन्हेगारांसाठी लुटीची संधी ठरत असल्याचं उघड झालं आहे. हे सायबर गुन्हेगार मोठ-मोठाल्या कंपनीत नोकरी लाऊन देण्याचे आमिष देऊन कधी रजिस्ट्रेशनच्या नावानं, तर कधी इतर कारणानं पैशांची मागणी करतात.
काय आहे प्रकरण?
सध्या कमी वेळात जास्त पैसा कमवण्याच्या प्रयत्नात अनेक जण दिसतात. अनेक तरुणांचा यातच घात होतो. कधी यूट्यूबवर व्हिडिओ लाईक करण्यासाठी, चित्रपटाला रेटिंग देण्यासाठी घरबसल्या पैसे कमविण्याची आमिष दिले जातं. यात सुरुवातील थोडा परतावा देऊन विश्वास निर्माण केला जातो. पण, त्यानंतर गोल्डन मेंबरशीप, तर कधी जमा पैसे काढण्याच्या बहाण्यानं वाढीव पैशांची मागणी केली जाते. बक्कळ पैसा मिळेल या आशेनं अनेक लोक कुटुंबीय, मित्रांकडून पैसे उधार घेतात. पण, एकदा पैसे दिले की, सायबर चोर फोन उचलणंही बंद करतात. जोपर्यंत फसवणूक झाल्यातं कळतं, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. यासंदर्भातील तक्रारींमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
वाचा - अनैतिक संबंध आणि तंत्र-मंत्राच्या नादात आईचे भान हरपले, दोन निष्पाप मुलांचा...
सायबर गुन्हेगार आता हायटेक झाले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत देखील बदल केला आहे. सायबर गुन्हेगारांचे शिकार बनणाऱ्यांमध्ये 20 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळं सोशल मीडिया किंवा इंटरनेट वेबसाईटवर रोजगार शोधताना तरुणांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Financial fraud