नवी दिल्ली, 23 जुलै : सध्या देशभरात टोमॅटोचा भाव वधारला आहे. यामुळे शेतकरी मालामाल होत आहेत. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर आता चोरांची नजर पडली आहे. काही दिवसांपूर्वी लुटीच्या उद्देशाने एका शेतकऱ्याची हत्या झाली होती. आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याकडून दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचे टोमॅटो लुटल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी एका जोडप्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याकडे 2.5 टन टोमॅटो होते, जे आरोपींनी महामार्गावर किरकोळ अपघातानंतर लुटले. या टोळीत एका जोडप्याचाही समावेश आहे. पोलिसांनी 28 वर्षीय भास्कर आणि त्याची पत्नी सिंधुजा (26) यांना तुरुंगात टाकले आहे. ते शेजारच्या तामिळनाडू राज्यातील रहिवासी आहेत. काय आहे प्रकरण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील वेल्लोर येथील या जोडप्याने 8 जुलैला चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर येथील मल्लेश या शेतकऱ्याच्या ट्रकला कारने किरकोळ धडक दिली. त्यानंतर नुकसानभरपाई म्हणून 10 हजार रुपयांची मागणी करू लागले. शेतकऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्याने या टोळीने 2 लाख रुपये किमतीचे अडीच टन टोमॅटोचा ट्रक घेऊन पलायन केले. याआधी त्यांनी शेतकऱ्याला मारहाणही केली. वाचा - महिलांची अंतर्वस्त्र चोरणारा अटकेत, चौकशीत सांगितले धक्कादायक कारण तीन आरोपी अद्याप फरार या प्रकरणी, शेतकऱ्याच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 379 (चोरी) आणि 390 (दरोडा) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवून टोळीवर लक्ष केंद्रित केले. भास्कर आणि त्याची पत्नी सिंधुजा यांना शनिवारी अटक करण्यात आली. मात्र, या टोळीशी संबंधित अन्य तीन जण अद्याप फरार आहेत. व्यापाऱ्यांकडून मोफत टोमॅटोची ऑफर सध्या देशात टोमॅटोचे भाव चढतच चालले आहेत. काही शहरांमध्ये टोमॅटो 250 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळेच टोमॅटोची चोरी, लुटमारीच्या घटनाही समोर येत आहेत. लोकांना सवलतीच्या दरात टोमॅटो देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या टोमॅटोचे वाढलेले भाव पाहता अनेक छोटे व्यापारी माल खरेदीवर एक किलो टोमॅटो मोफत देण्यासारख्या योजनाही राबवत आहेत. चंदीगडमधील एका ऑटोचालकाने लोकांना पाच राइड घेतल्यास एक किलो टोमॅटो मोफत देऊ केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.