जळगाव, 31 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावात एका 17 वर्षीय मुलीचा बालविवाह करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी परभणी जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. तिला तिच्या गावातीलच महिलेने जळगावात आणून तिची विक्री करत तिचा बालविवाह करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही 17 वर्षीय मुलगी आपल्या पालकांसोबत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एका गावात राहते. तर याच गावात मुलीच्या काकाच्या घरात एक लक्ष्मी नावाची महिला ही भाड्याने राहत होती. या महिलेसोबत मुलीच्या कुटुंबीयांची ओळख होती. त्यामुळे या ओळखीच्या माध्यमातून लक्ष्मी या महिलेने 21 ऑगस्टला मुलीच्या आईला तिच्या लग्नाविषयी सांगितले. तसेच जळगाव शहरात एक चांगले स्थळ आहे. त्यामुळे मी तिला जळगावात घेवून जाते, असे तिने सांगितले. इतकेच नव्हे मुलाकडे जाऊन बघण्याचा कार्यक्रम करुन येते, असेही तिने या मुलीच्या आईला सांगितले. यानंतर तिच्या सांगण्यावर या मुलीच्या आईने विश्वास ठेवला. त्यानुसार 22 ऑगस्टला लक्ष्मी या मुलीला घेऊन जळगावात आली होती. येथे आल्यावर लक्ष्मी या मुलीला कुसूंबा गावात घेवून गेली. याठिकाणी दुसऱ्या दिवशी एका गावात जाऊन लक्ष्मी हिचा दीर आणि त्याच्या बायकोने या मुलीचा एका तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. हा मुलगा वयाने मोठा होता. त्यामुळे या मुलीने लग्नास नकार दिला. मात्र, या लग्नाच्या बोलीसाठी लक्ष्मीने तिचा दीर आणि त्याच्या बायकोकडून पैसे घेतले होते. मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर ते पैसे परत कर, अशी मागणी लक्ष्मीकडे दोघांनी केली. हीच बाब मुलीने ऐकून घेतली होती. तर मुलीचा नकार होता, तरीसुद्धा तिचा होकार मिळवण्यासाठी लक्ष्मीने या अल्पवयीन मुलीला तीन दिवस जळगाव शहरात ठेवले. यादरम्यान ती या मुलीला तरुणाच्या घरीसुद्धा घेऊन गेली. मात्र, यानंतरही या मुलीने लग्नाला नकार दिला. हेही वाचा - जळगाव : पत्नीनं घटस्फोट दिला, अन् रागाच्या भरात पोलिसाच्याच लगावली कानशिलात या मुलीला आपला बळजबरीने विवाह लावून देतील, अशी भिती होती. त्यामुळे तिने तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र, लक्ष्मीने तिला मारहाण केली. तर यावेळी मुलीने आरडाओरड केल्याने गर्दी जमा झाली. दरम्यान, या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या मुलीला सोबत घेत तिला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी बालकल्याण समितीसमोर मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी लक्ष्मी हिच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.