नवी दिल्ली, 16 जानेवारी : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ इंटरसेप्ट केला होता. हा व्हिडिओ जहांगीर पुरीमध्ये राहणाऱ्या जगजित आणि नौशाद या दोन दहशतवाद्यांनी त्यांच्या हँडलरला पाठवला होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तातडीनं कारवाई करून दोन्ही दहशतवाद्यांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पाकिस्तानातील हरकत उल अन्सार या दहशतवादी संघटनेनं भारतात प्रजासत्ताक दिनी मोठा कट रचला होता. ही संघटना 27 जानेवारीला बजरंग दलाच्या एका प्रमुख नेत्याची हत्या करणार होती. या शिवाय शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे नेतेही या संघटनेच्या निशाण्यावर होते. या टार्गेट किलिंगसाठी या संघटनेनं जहांगीरपुरी येथून अटक केलेल्या दहशतवाद्यांना कंत्राट दिलं होते. पहिलं टार्गेट पूर्ण केल्यावर या दहशतवाद्यांना संघटनेकडून 50 लाख रुपये मिळणार होते. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत दहशतवाद्यांनी कबूल केलं आहे की, या हत्यांच्या तयारीसाठी त्यांना पाच लाख रुपये आधीच मिळाले आहेत. ही रक्कम हवालाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहचली आहे. दहशतवाद्यांनी सांगितलं की, एका तरुणाच्या हत्येचा व्हिडिओ संघटनेच्या हँडलरला पाठवल्यानंतर त्यांना हे काम मिळालं. दहशतवादी संघटनेनं ज्या नेत्यांना टार्गेट केले आहे त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळाली आहे. त्या आधारे त्यांनी संबंधित नेत्यांवर पाळत ठेवण्याचं कामही सुरू केलं होतं. प्लॅनची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा केली जात होती. डेमोसाठी पाठवला होता व्हिडिओ दिल्ली स्पेशल सेलला मिळालेला व्हिडिओ दहशतवाद्यांनी डेमो म्हणून कॅनडामध्ये बसलेल्या हँडलरला पाठवला होता. एका तरुणाची हत्या केल्याचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या माध्यमातून या दहशतवाद्यांनी आपला हेतू भयंकर असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 37 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांनी तरुणाच्या मृतदेहाचे आठ तुकडे केल्याचं दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही दहशतवाद्यांना जहांगीरपुरी येथून अटक केली आहे. दहशतवाद्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दिल्लीतील भालस्वा डेअरी येथील घरातून तरुणाचा मृतदेह आणि दोन हातबॉम्ब जप्त केले. तरुणाच्या मृतदेहाचे तीन तुकडे झाले आहेत, असा समज होता. मात्र, आरोपींनी मृतदेहाचे आठ तुकडे केल्याचं तपासात निष्पन्न झालं. या संपूर्ण घटनेचा संबंध पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी जोडला गेला असल्याचं निदर्शनास आलं आहे. हेही वाचा - लग्नाचे आमिष देऊन 23 वर्षीय वार्डबॉयचे 30 वर्षाच्या नर्ससोबत धक्कादायक कृत्य, सतत दोन वर्ष… प्रत्येक टार्गेटसाठी मिळणार होते 50 लाख रुपये दहशतवाद्यांनी पोलीस चौकशीत कबूल केलं आहे की, त्यांच्याकडे टार्गेट आणि एका टार्गेटसाठीची रक्कमही निश्चित करून पाठवण्यात आली होती. पहिलं टार्गेट पूर्ण होताच त्यांना 50 लाख रुपये मिळणार होते. दुसरं आणि तिसरं टार्गेट पूर्ण झाल्यावर पुन्हा 50-50 लाख रुपये मिळणार होते. या खुलाशानंतर पोलिसांनी दहशतवादी नेटवर्कसह हवाला नेटवर्कच्या मुळांचा शोध सुरू केला आहे. 31 जानेवारीला दुसरं टार्गेट होणार होतं पूर्ण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीर पुरी येथून पकडलेले दहशतवादी जगजीत आणि नौशाद यांनी पोलिस चौकशीत सांगितलं आहे की, 27 जानेवारीला बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येनंतर दुसरी हत्या 31 जानेवारीला होणार होती. 31 तारखेला काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याची हत्या होणार होती. हा नेता देशव्यापी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्यानंतर ही घटना घडणार होती. या टार्गेटच्या यशानंतर शिवसेनेच्या एका नेत्याला मारणं हे, तिसरं टार्गेट होतं. पोलिसांनी दोघा दहशतवाद्यांना न्यायालयात हजर केलं आहे. पुढील चौकशीसाठी न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.