जालना, 31 जानेवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खोतकरांचे जावई विजय झोल यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. उद्योजकाला गुंडांच्या मदतीने धमकावल्याप्रकरणी किरण खरात यांच्या तक्रारीवरून क्रिकेटर विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय झोल हे खोतकरांचे जावई असल्यानं याला राजकीय रंग आला होता. या प्रकरणी विजय झोल आणि त्यांचे बंधू विक्रम झोल यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. व्यक्तीगत जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय.
विजय झोल यांच्यावर काय आहेत आरोप?
किरण खरात यांच्या तक्रारीनुसार, विजय झोलने आपल्या गुंड पाठवून बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप झाला आहे. विजय झोल त्याचा भाऊ विक्रम झोल यांच्यासह 15 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांनी मला किडनॅप केलं होतं. मला पुण्यातून जालन्याला आणलं त्यानंतर माझं घर, माझे प्लॉट हे बंदुकीच्या धाकावर माझ्याकडून रजिस्ट्ररी करून घेतले असंही किरण खरात यांनी माध्यमांना सांगितलं आहे. उद्योजक किरण खरात यांनी हे सांगितलं आहे की क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोलने गुंतवणूक केली होती. मात्र, करन्सीचं बाजारमूल्य घसरलं. त्यामुळे मलाच दोषी ठरवत विजय झोल आणि त्याच्या भावाने काही गुंड माझ्या घरी पाठवले आणि मला ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी विजय झोल, विक्रम झोल यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा - शिंदे सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम वाढवली, पुरस्कारचं स्वरुपही बदललं
क्रिप्टो करंसीमध्ये नुकसान झाल्याने..
मिळालेल्या माहितीनुसार, घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. यात किरण खरात यांना क्रिप्टो करंसीमध्ये बीएमडब्लू कारही गिफ्ट मिळाली होती. त्यामुळे त्यांच्याकडे आकर्षित होऊन अनेकांनी क्रिप्टो करंसीमध्ये पैसे गुंतवले होते. त्यानुसार विजय झोल यांनीही पैसे गुंतवले. मात्र, जागतिक मंदी असल्याने अनेकांचे पैसे बुडाले. यात विजय यांचेही पैसे बुडाल्याने झोल यांनी किरण खरात यांचे अपहरण केल्याची माहिती समोर आली होती.
आमदार कैलास गोरंट्याल यांचेही आरोप
जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावर पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. 'काही गुंड किरण खरात यांना मारण्यासाठी त्यांच्या गावी मंगरूळ येथे गेले होते, मात्र गावकरी जमा झाल्याने दुर्घटना टळली. किरण खरात हे जालना येथे तक्रार देण्यासाठी येत होते. परंतु, त्यांना पोलिसांनी अडवल्याने तक्रार दाखल झाली नव्हती,' असा आरोप केला होता. त्यानंतर रात्री उशिरा घनसावंगी पोलीस ठाण्यात किरण खरात यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Eknath Shinde