जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / रेल्वेत नोकरीच्या जाहिरातीची लिंक आली तर क्लिक करू नका, नाहीतर...

रेल्वेत नोकरीच्या जाहिरातीची लिंक आली तर क्लिक करू नका, नाहीतर...

Railway

Railway

तीन जणांच्या टोळीने संगनमत करून एका तरुणाला तब्बल 5 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अंबरनाथ, 11 मार्च : सावधान! रेल्वेत नोकरी (Railway Job) लावण्याच्या जाहिरातीची लिंक जर तुमच्या मोबाईलवर आली तर लगेच त्या जाहिरातीला भुलू नका. नाहीतर तुमची लाखो रुपयांना फसवणूक होऊ शकते.असाच फसवणुकीचा प्रकार अंबरनाथ शहरात उघडकीस आला आहे. इथे तीन जणांच्या टोळीने संगनमत करून एका तरुणाला तब्बल 5 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. मात्र, यातील मुख्य आरोपीला अंबरनाथ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कदायक म्हणजे, यातील मुख्य आरोपी हा आयआरसीटीसीच्या (IRCTC) चर्चगेट स्टेशनवरील कँटीनमध्ये काम करतो. बदलापूरमध्ये राहणाऱ्या कुमार चव्हाण यांना रेल्वेमध्ये नोकरी लागेल असे स्वप्न पहिले होते. त्यासाठी त्यांनी 5 लाख देखील खर्च केले, मात्र त्यांचे स्वप्न भंगले आहे. बेरोजगार असलेला कुमार नोकरीच्या शोधात असतानाच त्याला कैलास सिंग या भामट्याने रेल्वेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. कुमार देखील या अमिषाला भुलला. कैलास आयआरसीटीसीच्या चर्चगेट स्टेशनवरील कँटीनमध्ये काम करत असल्याने रेल्वेत आपले काम होईल असा पक्का विश्वास कुमारला होता. मात्र, त्याकरिता आरोपी कैलासने खोटी परीक्षा, खोटी मुलाखत घेऊन पास होण्यासाठी कुमारकडून तब्बल 5 लाख रुपये उकळले. रेल्वेतील अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचं सांगून त्याने कुमारला खोटं नियुक्तीपत्रही दिलं. मात्र, त्यानंतर आरोपी कैलासने राहण्याचे ठिकाण बदलले, तो काहीच प्रतिसाद देत नव्हता, टाळाटाळ करत होता. त्यामुळे हा सगळा प्रकार खोटा असून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच कुमारने पोलिसात धाव घेतली. कैलास सिंग हा त्यावेळी अंबरनाथला राहात असल्यानं याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कैलास आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कैलासच शोध घेत होते मात्र दर एक ते दोन महिन्यांनी तो  राहण्याचा ठावठिकाणा बदलत होता. अखेर विरारहून मोठ्या शिताफीने अंबरनाथ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी कैलासकडे चौकशी केली असता या प्रकरणात राहुल सिंग आणि राजेश झा हे रेल्वेचे कर्मचारी सुद्धा यात सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कैलास सिंग हा या दोघांना नवी गिऱ्हाईकं शोधून द्यायचा, तर हे दोघे बनावट लेटरहेड आणि शिक्के वापरुन फसवणूक करायचे, असं समोर आलं. त्यामुळे पोलीस आता या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे.आता या टोळीने अशा प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून किती जणांना गंडा घातलाय याचा पोलीस तपास करत आहे. कशी होती तरुणांना गंडवण्याची पद्धत  डी ग्रुप म्हणून रेल्वे खात्यात पोर्टल आहे. त्यामध्ये नोकरी लावून देतो असे कैलासने कुमारला सांगितले होते. त्यासाठी त्याने जाहिरातीची लिंक देऊन फॉर्म भरण्यास सांगितले. यानंतर तुझी मुलाखत होणार मात्र त्याच्या आधी आम्हाला पैसे दिले तर नियुक्त पत्र देखील देऊ शकतो, असे कैलासने कुमारला सांगितले. त्यानुसार, नियुक्ती पत्र देखील द्यायचे, मात्र त्यानंतर राहण्याच्या ठिकाणाहून पोबारा करायचे. कैलासने राहुल सिंग आणि राजेश झा यांनी संगनमताने हा गुन्हा केला असून त्यांच्या अकाउंटला पैसे देखील आले असून सगळे पुरावे आम्ही गोळा केले असून इतर आरोपीने देखील लवकरच अटक केली जाईल, असे अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात