अकोला, 23 जून : ग्रामीण भागामध्ये आर्थिक दुर्बल व मागासलेल्या लाभार्थ्यांकरिता शासनाने त्यांच्या हक्काची घरकुल योजना आणली आहे. परंतु या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना सहजतेने मिळूच शकत नाही, हे सत्य आहे. त्यासाठी या लाभार्थ्यांना अनेक त्रास सहन करावे लागतात. त्यांना ग्राम स्तरापासूनच ते पंचायत समितीमधील घरकुल विभागापर्यंत संबंधितांच्या घशामध्ये लाभातील काही रक्कम टाकावीच लागते, असा दावा केला जात आहे. अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने एका घरकुल लाभार्थ्यांने कंटाळून ग्राम स्तरापासून ते संबंधित विभागापर्यंत होत असलेल्या या महाभागांना वठणीवर आणण्याकरिता अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. यानंतर मात्र लाचलुचपत विभागाने रचलेल्या सापळ्यात उपसरपंच, लिपिक आणि अभियंता, रोजगार सेवक पुरते अडकले. यांनी घरकुलाच्या लाभाच्या अनुदान धनादेश काढून देण्यासाठी मागितलेल्या लाचेवर डल्ला मारताच चौघेहीजण एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना नुकताच अकोल्यात उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, व्यवसायाने शेत मजुर असणाऱ्या खडकी टाकळी येथील 42 वर्षे वय असलेल्या घरकुल लाभार्थ्यांने केलेल्या तक्रारी वरून उपसरपंच दिलीप दौलत सदाशिव वय 52 वर्षे, खडकी टाकळी, पो. सुकोडा, ता. जि.अकोला, ग्रामीण गृह निर्माण,( कंत्राटी) अभियंता अमित युवराज शिरसाट (वय 26 वर्ष) लिपिक सुधीर मनतकार वय 35 वर्षे, पंचायत समिती घरकुल विभाग, अकोला व रोजगार सेवक योगेश अरुण शिरसाट वय 29 वर्षे या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 21 जून रोजी पडताळणी केल्यानंतर काल मंगळवार 22 जून रोजी आगर येथे सापळा लावला असता 2 हजार 500 रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. हे ही वाचा- सौंदर्याच्या जाळ्यात! नेते, बिजनेसमॅन, अधिकारीही Sextortionists च्या निशाण्यावर आरोपींनी तक्रारदार यांचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचे जिओ टॅगिंग करून तिसऱ्या हप्त्याचा धनादेश काढण्यासाठी तक्रारदारास उपसरपंच यांनी 3 हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती 2 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर मात्र अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.