जयपूर, 13 जून : राजस्थानमध्ये (Rajasthan News) तंत्र-मंत्र आणि अंधविश्वासाच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. राज्यातील श्रीगंगानगर जिल्ह्यातून दोन बहिणींवरील अत्याचाराची घटना समोर आली आहे. अंधविश्वासाच्या वेडापायी या दोघींनी गरज सळईने चटके देण्यात आले. आता पुन्हा जिल्ह्यातील एका निरागस मुलासोबत तंत्र-मंत्राच्या नावाखाली राक्षसी कृत्य करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, या उकाड्यात त्याला वाळूच्या आत गाडण्यात आलं. त्याच्या जवळच दोन मांत्रिक बसले होते. व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांचं याकडे लक्ष गेलं. रविवारी काही जणं तेथे पोहोचले तर चिमुरड्याला मांत्रिकाकडून भयंकर यातना दिल्या जात होत्या. काही वेळानंतर या लोकांनी चिमुरड्याची त्या राक्षसांकडून सुटका करवून घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुरडा हरयाणाचा राहणारा आहे आणि त्याला काही अंशी अपंगत्व आलं होतं. ज्यानंतर कुटुंबीयांनी उपचारासाठी त्याला मांत्रिकाच्या हवाली केलं. उपचाराच्या नावाखाली मांत्रिकांनी चिमुरड्यासोबत भयंकर कृत्य केलं.
तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही मांत्रिकांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी याच जिल्ह्यातील दोन बहिणींचं मांत्रिकांनी उपचाराच्या नावाखाली शोषण केलं होतं. त्यांना गरम सळईचे चटकेही दिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.