ठाणे, 28 मे : गेल्या दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पोलिसांचा धाक उरला नसल्याची टीकाही केली जात आहे. अशातच आता किरकोळ कारणातून एका 75 वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याची घटना विरार पूर्वेकडील मांडवी परिसरात घडली आहे. भिवा भिखा वायडा (वय 75) अशी हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या हत्येमागचं कारणही तितकच धक्कादायक आहे. काय आहे प्रकरण? विरार पूर्वेकडील मांडवी पोलीस हद्दीत एका 75 वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. या प्रकरणी मांडवी पोलिसांनी वेगवेगळी तीन पथके तयार करून मारेकऱ्याचा शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिरसाड येथे आरोपीला सापळा रचून पकडण्यात आले. सदर आरोपी हा उसगाव येथेच राहणारा आहे. विनोद उर्फ कांद्या महादू बसवंत (वय 35) असे त्याचे नाव असून बायको नांदावी यासाठी त्याने भगत असलेल्या भिवाला जागरण करण्यासाठी दोन हजार रुपये दिले होते. मात्र, जागरणाचा काहीही फायदा न झाल्याने मनात राग धरलेल्या विनोदने भिवाला बोलावून दारू पाजली. त्यानंतर बाचाबाची करून भिवाला उसंगाव येथील देसाई वाडी बस स्टँडजवळ नेऊन त्याची सिमेंटच्या दगडाने ठेचून हत्या केली. वाचा - जुना वाद वाढदिवसाच्या पार्टीत विकोपाला; तरुणावर तलवारीने सपासप वार अन् हत्यारा विनोद हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी खुनाच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे त्याला सोडण्यात आले होते. सदर आरोपी हा गुन्हे प्रवृत्तीचा असल्याने त्याचे समाजात खुलेपणाने वावरणे सामाजिक हितासाठी धोक्याचे आहे. यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मांडवीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रफुल वाघ यांनी बोलताना सांगितले. वसई-विरारमध्ये गुन्हेगारांचे भय वसई-विरार, मिरा-भाईंदर शहर आयुक्तालयाच्या क्षेत्रात गेल्या वर्षभरात 36 खुनाच्या घटनांची नोंद झाली आहे; तर 35 जबरी चोरींची नोंद झाली आहे. फक्त वसई-विरारमध्ये 29 खून आणि 23 जबरी चोरींची नोंद आहे. वसई-विरार शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दाटीवाटीच्या वस्तीत गुन्हेगार आश्रय घेत गुन्हे करत आहेत. अनेकदा अमली पदार्थ तस्करी केली जात आहे. अशा गुन्हेगारांवर पोलिसांकडून कारवाईही केली जात आहे. त्यातच आपसातील मतभेद, क्षुल्लक वाद, जमिनीवरून होणाऱ्या हाणामाऱ्या यासह अन्य कारणाने हत्यारे उगारली जात आहेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.