मुंबई, 22 एप्रिल : मुंबईतील मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात काम करणाऱ्या महिलेने प्रियकर आणि मुलासोबत मिळून एकाा 69 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केल्याचे उघड झाले आहे. चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरी डीकोस्टा (वय ६९) असं मृत वृद्ध महिलेचं नाव आहे. हत्येनंतर सोनसाखळी, स्मार्ट घड्याळ आणि मोबाईल चोरून आरोपी फरार झाले होते. मालाड पोलिसांनी घरकाम करणाऱ्या शबनम शेख (४२), तिचा मुलगा शहजाद उमर शेख (२१) आणि महिलेचा प्रियकर उमर शेख (७१) यांना अटक केली आहे.
२० एप्रिल रोजी सकाळी 7 च्या सुमारास मालाड पोलिसांना माहिती मिळाली की मालाड वेस्ट ऑर्लेम चर्चजवळील न्यू लाईफ बिल्डिंगच्या बाथरूममध्ये ६९ वर्षीय महिलेचा पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाला. मालाड पोलिसांनी मृतदेह शताब्दी रुग्णालयात तपासासाठी पाठवला. मालाड पोलिसांनी एडीआरचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वृद्ध महिला आपल्या नातवासोबत न्यू लाईफ सोसायटीमध्ये राहत होती. तपासात वृद्ध महिलेच्या नातवाने महिलेची सोनसाखळी, स्मार्ट घड्याळ आणि मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितलं. पोलीस सोसायटीने सीसीटीव्ही तपासले असता एक व्यक्ती संशयास्पद दिसला. जो डोक्यावर टोपी आणि मास्क घालून इमारतीत जाताना दिसला. पोलिसांनी घरात काम करणारी महिला आणि तिच्या मुलाशी चर्चा केली असता महिलेने ओळख पटवण्यास नकार दिला. मालाड पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात संशयित व्यक्ती हा घरकाम करणाऱ्या महिलेचा प्रियकर असल्याचे निष्पन्न झाले. मालाड पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिला आणि तिच्या मुलाला मालाड मालवणी गेट क्रमांक ७ येथून अटक केली. वसईतून त्याच्या प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. वृद्ध महिलेची हत्या केल्यानंतर तिन्ही आरोपींनी तिला बाथरूममध्ये नेलं आणि तिची आत्महत्या दाखवण्यासाठी मोठ्या बादलीनं पाणी ओतलं. त्यामुळे बाथरूममध्ये पडून महिलेचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तिघांनी मिळून हत्येची योजना आखली होती. पण पोलिसांनी अचूक तपास करून खुनाची उकल केली.