लखनऊ 02 जून : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे एका 90 वर्षीय वृद्धाला जन्मठेपेसह 55 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गंगा दयाळ असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तब्बल 42 वर्षं जुन्या एका प्रकरणात फिरोजाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवार (31 मे 2023) रोजी हा निकाल दिलाय. 1981 मध्ये 10 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 10 जण दोषी आढळले होते. मात्र, या खटल्याच्या सुनावणीदरम्यान गंगा दयाळ वगळता इतर 9 दोषींचा मृत्यू झाला. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.‘उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात रेशन दुकान मालकाच्या विरोधात तक्रार केल्याबद्दल 10 दलितांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. डिसेंबर 1981 मध्ये तत्कालीन शिकोहाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील साधुपूर गावात ही हत्या झाली होती,’ अशी माहिती जिल्हा सरकारी वकील राजीव उपाध्याय प्रियदर्शी यांनी दिली. उपाध्याय म्हणाले, ‘काही दलित गावकऱ्यांनी रेशन दुकानाच्या मालकाविरुद्ध तक्रार केल्यामुळे या हत्या करण्यात आल्या होत्या. आरोपी गंगादयाळ याने त्याच्या नऊ सहकाऱ्यांसह अंदाधुंद गोळीबार करीत या 10 जणांची हत्या केली होती.’ Delhi Murder Case : पीडितेची फुटलेली कवटी, 34 जखमा अन् नवं CCTV फुटेज, दिल्ली हत्या प्रकरणातील आतापर्यंतचे अपडेट ‘घटनेच्या वेळी शिकोहाबाद मैनपुरी जिल्ह्याचा भाग असल्यानं मैनपुरीच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. 1989 मध्ये फिरोजाबाद जिल्ह्याच्या निर्मितीनंतर, शिकोहाबाद हा फिरोजाबादचा एक भाग झाला. पण खटला हा मैनपुरी न्यायालयात सुरू होता. 2021 मध्ये हा खटला फिरोजाबाद न्यायालयात हस्तांतरित करण्यात आला. परंतु तोपर्यंत 10 पैकी नऊ आरोपींचा मृत्यू झाला होता. या 42 वर्षं जुन्या खटल्यातील एकमेव जिवंत आरोपी गंगा दयाळ हा निकालाच्या दिवशी (31 मे 2023) जिवंत होता, तेव्हा त्याला जिल्हा न्यायाधीश हरविरसिंग यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली,’ असंही उपाध्याय यांनी सांगितलं. पोलिसांनी केली आरोपीला अटक खटला सुरू असताना जामिनावर बाहेर असलेल्या आरोपी गंगा दयाळ याला बुधवारी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर फिरोजाबाद पोलिसांनी अटक केली, व त्याची रवानगी तुरुंगात केली. दरम्यान, घटनास्थळी आरोपी उपस्थित असल्याचं सिद्ध झाल्यानं न्यायालयानं त्याला शिक्षा सुनावली आहे. तर, या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना, तक्रारदार प्रेमवती (वय 80) यांनी म्हटलं आहे की,’प्रकरणातील मुख्य आरोपी खटल्याचा निर्णय होण्यापूर्वीच मरण पावला.’ नेमकी काय झाली शिक्षा? या खटल्यात आरोपी गंगा दयाळ याला हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं असून, त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा व 50,000 रुपये दंड करण्यात आलाय. तसेच आरोपीला खुनाच्या प्रयत्नासाठी देखील दोषी ठरवण्यात आलं असून, त्यासाठी 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आलाय. न्यायालयामध्ये फिर्यादीच्या वकिलांनी, अशा सामूहिक हत्या दुर्मिळ प्रकरणांच्या श्रेणीत येत असल्यानं गंगा दयाळ याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तर, आरोपीच्या वयामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती बचाव पक्षानं केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.